ऑकलंड : ‘यंदाच्या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट खेळेल, अशी आशा आहे. न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व तोच करेल’, असा विश्वास न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य निवडकर्ते गोविन लार्सन यांनी व्यक्त केला. जगभरातील विविध टी-२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी बोल्टने गेल्यावर्षी न्यूझीलंड क्रिकेटच्या (एनझेडसी) केंद्रीय करारातून स्वत:ला वेगळे केले होते. बोल्ट सध्या यूएईमध्ये इंटरनॅशनल टी-२० लीगमध्ये खेळत आहे.
बोल्टने नुकताच आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, अद्याप त्याच्या न्यूझीलंड संघातील सहभागाबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. लार्सन यांनी म्हटले की, ‘बोल्टसाठी दरवाजे उघडलेले आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांच्याशी बोल्ट सातत्याने संपर्कात आहे.
आम्हाला सर्वांना बोल्टच्या अनुभवाविषयी आणि त्याच्या क्षमतेविषयी कल्पना आहे. अनेक वर्ष तो न्यूझीलंडसाठी विजेता ठरलेला आहे. त्यानेही विश्वचषक स्पर्धेच्या मोहिमेत संघामध्ये सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्याच्या परिस्थितीची आम्हाला जाणीव असून, आम्ही त्याच्यासोबत काम करणे कायम ठेवू.’
बोल्ट आणि टिम साऊदी या दोन अनुभवी वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीचा न्यूझीलंडला भारत दौऱ्यात मोठा फटका बसला. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांना फार संघर्ष करावा लागला.