मुंबई : भारतीय महिलांना तिरंगी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सहा विकेट्सने पराभव पत्करावा लागला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 152 धावा केल्या होत्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने चार फलंदाज गमावत पूर्ण केले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सलामीवीर स्मृती मानधानाने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. स्मृतीने 41 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 67 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. स्मृती आणि मिताली राज यांनी 72 धावांची सलामी दिली, यामध्ये मितालीचा वाटा होता फक्त 18 धावांचा. स्मृती दमदार फलंदाजी करत असली तरी तिला अन्य फलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अनुजा पाटीलने अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी केली, तिने 21 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 35 धावा केल्या.
भारताच्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. पण बेथ मूनीने 32 चेंडूंत 8 चौकारांच्या जोरावर 45 धावा करत संघाला स्थिरस्थावर केले. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगने (नाबाद 35) अखेरपर्यंत किल्ला लढवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताचा या पुढील सामना इंग्लंडविरुद्ध 25 मार्चला खेळवण्यात येणार आहे.