A tribute by Anushka Sharma to captain Virat Kohli: विराट कोहलीनं शनिवारी जगाला धक्का देणारी बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली अन् चाहते हळहळले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवाच्या २४ तासातच विराटनं भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयनं विराटकडून वन डे संघाचे नेतृत्व काढून घेतले. त्यामुळे कसोटी संघाचे कर्णधारपद विराटकडे राहिले होते, परंतु तो आता माजी कर्णधार झाला आहे. आता एक फलंदाज म्हणून भारतासाठी तो खेळणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या कसोटी संघानं आयसीसी क्रमवारीत सातव्या स्थानावरून अव्वल स्थानापर्यंतचा अविश्वसनीय प्रवास केला. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी कसोटी मालिकेत पराभूत केलं. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून विराटनं स्वतःची ओळख निर्माण केली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकले.
विराटच्या या प्रवासाची साक्षीदार असलेली त्याच पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) हिनं इंस्टाग्राममवर भावनिक पत्र लिहिलं आहे. त्यात तिनं विराटच्या या प्रवासाची माहिती दिली आहे. ती म्हणते,'' २०१४ची गोष्ट आजही मला आठवतेय. महेंद्रसिंग धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि तू मला सांगितलेस की मी कसोटी संघाचा कर्णधार बनणार आहे. दुसऱ्याच दिवशी तू, MS आणि मी गप्पा मारत होतो आणि तेव्हा तुझ्या दाढीचे केस आतापासूनच राखाडी होत असल्याचे गमतीनं MS म्हणाला. आपण सर्व तेव्हा भरपूर हसलो होतो. त्यादिवसापासून तुझ्या दाढीचे केस राखाडी होताना मी पाहतेय. मी तुझ्यातली वाढ पाहिली आहे, अफाट वाढ. तुझ्या आजूबाजूला आणि तुझ्या आत. आणि हो भारताच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून तुझ्या वाढीचा आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघानं मिळवलेल्या यशाचा मला सार्थ अभिमान आहे. परंतु, त्याहीपेक्षा तुझ्यात अंतरंगात झालेल्या वाढीचा मला अधिक अभिमान आहे.''
ती पुढे लिहिते,''२०१४मध्ये तू तरुण आणि भोळा होतास. तू अनेक आव्हानांना सामोरे गेलास, ती आव्हान फक्त मैदानावरची नव्हती. हे खरं आयुष्य आहे, याची जाण तुला झाली. पण, मला हे सांगताना आनंद होतोय की तू तुझ्या चांगल्या हेतूनं सर्व आव्हानं यशस्वीरित्या पार केलीस. तू एक उदाहरण तयार केलंस आणि तुझ्या एनर्जीनं तू प्रत्येकामध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण केलीस. काही वेळा तू हरलास, पण त्यावेळी तुझ्या बाजूला बसून मी तुझ्या डोळ्यांतील अश्रू पाहिले आहेत. अजून चांगल करता आलं असतं, असं तुला त्यावेळी वाटायचं. हा असाच तू आहेस आणि तुला इतरांकडूनही अशीच अपेक्षा आहे.''