A tribute by Vikas Kohli to captain Virat Kohli: विराट कोहलीनं शनिवारी जगाला धक्का देणारी बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली अन् चाहते हळहळले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवाच्या २४ तासातच विराटनं भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयनं विराटकडून वन डे संघाचे नेतृत्व काढून घेतले. त्यामुळे कसोटी संघाचे कर्णधारपद विराटकडे राहिले होते, परंतु तो आता माजी कर्णधार झाला आहे. आता एक फलंदाज म्हणून भारतासाठी तो खेळणार आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या कसोटी संघानं आयसीसी क्रमवारीत सातव्या स्थानावरून अव्वल स्थानापर्यंतचा अविश्वसनीय प्रवास केला. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी कसोटी मालिकेत पराभूत केलं. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून विराटनं स्वतःची ओळख निर्माण केली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकले. विराटच्या निर्णयानंतर त्याचा भाऊ आणि बहिण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विकास कोहलीनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विराटसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. तू कायमच चॅम्पियन होतास आणि आहेस, असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तसंच त्यानं विराटच्या पोस्टवर कमेंटही केली आहे. "तू संपूर्ण कुटुंब आणि देशाची मान उंचावली आहे. मला तुझा अभिमान आहे. तू कायम धैर्यानं सर्वाला सामोरं गेलास आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. आम्ही कायमच तुझ्यासोबत आहोत. देव तुझं भलं करो आणि आम्हाला कायमच तुझा अभिमान आहे चॅम्पियन," असं प्रतिक्रिया त्यानं दिली. लहानपणापासूनच तुझी खेळाप्रती आवड, प्रामाणिकपणा, समर्पण आम्ही पाहत आलो आहोत. तू वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलं आहे. हा निर्णय घेऊन तू तुझी ताकद दाखवून दिली आहे, असंही तिनं म्हटलं आहे.