IPL 2024 - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ पूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात आनंदाची बातमी आली आहे. आयपीएल ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने ८.४० कोटी रुपये मोजून संघात घेतलेल्या समीर रिझवीने आज त्रिशतक झळकावले.
सी के नायुडू ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेशने पहिल्या डावात ७४६ धावांचा डोंगर उभा करून सौराष्ट्रच्या गोलंदाजांची धुलाई केली. स्वास्तिक ( ५७) व ऋतुराज शर्मा ( १३२) यांच्या फटकेबाजीनंतर कर्णधार समीर रिझवीने २६६ चेंडूंत ३३ चौकार व १२ षटकारांच्या मदतीने ३१२ धावा चोपल्या. चौकार-षटकारांनी त्याने २०४ धावा कुटल्या. त्याला सिद्धार्त यादव ( ८४), आदीत्य शर्मा ( ३४) व विपराज निगम ( ३५) यांनी त्याला चांगली साथ दिली.
चेन्नई सुपर किंग्सने पर्समध्ये शिल्लक असलेल्या ११.६० कोटींमधले ८.४० कोटी समीर रिझवीसाठी मोजले. २० कोटी मुळ किंमत असलेल्या समीरसाठी गुजरात टायन्स व चेन्नई सुपर किंग्स यांनी बोली लावली. या दोघांनी बोली एवढी वर नेली की ती ८ कोटीपर्यंत पोहोचली. या दोघांव्यतिरिक्त अन्य संघांनी फार रस दाखवला नाही. ७.६० कोटीनंतर गुजरातने माघार घेतली आणि दिल्ली कॅपिटल्सची एन्ट्री झाली. पण, चेन्नईने ८.४० कोटींत ही डिल पक्की केली.
कोण आहे समीर रिझवी? २० वर्षीय समीर रिझवीने उत्तर प्रदेश ट्वेंटी-२० लीगमध्ये कानपूर सुपरस्टार्स संघातून खेळतो. त्याने या स्पर्धेत ९ डावांत २ शतकांसह ४५५ धावा चोपल्या. पंजाब किंग्ससह त्याला आयपीएलमधील तीन फ्रँचायझींनी ट्रायलसाठी बोलावले, पण ट्रायलमध्ये त्याला जाता आले नाही, परंतु त्याने राजस्थानविरुद्धच्या २३ वर्षांखालील वन डे सामन्यात उत्तर प्रदेश संघाकडून दमदार कामगिरी करून आपली छाप पाडली.