सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेत कसोटी आणि वनडेत शतकी खेळी करीत शानदार पुनरागमन करणारा यष्टिरक्षक फलंदाज लोकेश राहुल याने काही महिन्यांआधीच्या खराब फॉर्मबद्दल झालेल्या टीकेला उत्तर देताना बुधवारी सांगितले की, ‘तुम्ही टीकाकारांचा स्वभाव बदलू शकत नाही. मी त्यावेळी होणारी टीका सहन करण्याइतपत मानसिकदृष्ट्या तयार नव्हतो. त्यामुळे फार वाईट वाटत होते.’ आज सोशल मीडियावर जे लोक त्याची स्तुती करत आहेत तेच लोक काही काळापूर्वी त्याला खूप ट्रोल करत होते. सोशल मीडियावर ट्रोल केल्याने खूप फरक पडतो. खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण होते, असे त्याने सांगितले. सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटीत कठीण स्थितीत शतक ठोकणारा राहुल पुढे म्हणाला, ‘आपण लोकांना बदलू शकत नाही.
प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. टीका होत असताना मला फार वाईट वाटत होते. मागे वळून पाहताना असे वाटते की, त्यावेळी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवे होते. टीका सहन करण्याइतपत माझी मानसिक तयारी नसल्याने वाईट वाटणे स्वाभाविक होते.’ जखम आणि खराब खेळ यामुळे सोशल मीडियावर राहुल ट्रोल झाला होता.
ट्रोलिंगमुळे खूप फरक पडतो
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर राहुलला ट्रोलिंगबद्दल प्रश्न केला असता त्याने म्हटले, ‘असे केल्याने मला काय फायदा होईल? लोकांना जे म्हणायचे आहे ते म्हणतील. जर तुम्ही पब्लिक परफॉर्मर असाल तर चांगले प्रदर्शन करूनच टीका टाळू शकता किंवा त्याला उत्तर देऊ शकता. आज जे लोक माझी स्तुती करत आहेत, तेच कालपर्यंत मला शिव्या देत होते. सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे खूप फरक पडतो. पण, तुम्ही यापासून जितके दूर राहाल, तितके तुमच्या मानसिकतेसाठी चांगले असते.’
Web Title: trolling makes players vulnerable said kl rahul
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.