दुबई : श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील वन डे मालिकेतील पाचवा सामना यजमान श्रीलंकेने जिंकला. या मालिकेत यजमानांना प्रथमच जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या इंग्लंडवर विजय मिळवण्यात यश आले. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 26.1 षटकांनंतर थांबवण्यात आला. त्यामुळे डकवर्थ लुईस प्रणालीनुसार श्रीलंकेला 219 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. मात्र, या सामन्यातील पंच अलीम दार यांच्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली. इंग्लंडचा फलंदाज बाद असल्याचा निकाल देण्यासाठी भर पावसात पाकिस्तानचे पंच अलीम दार बराच काळ मैदानावर उभे होते.
श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या 367 धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे 8 फलंदाज 132 धावांवर माघारी परतले होते. 27व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फिरकीपटू अकिला धनंनजयाने इंग्लंडच्या लियॅम प्लंकेटला पायचीत केले. दार यांनी बाद असल्याचा निर्णय दिला, त्यावर प्लंकेटने रिव्ह्यू मागितला आणि लगेच पाऊस सुरू झाला. खेळाडूंनी लगेच ड्रेसिंग रूमकडे धाव घेतली, परंतु दार तिसऱ्या पंचांचा निर्णय येईपर्यंत मैदानावरच थांबले. पंचांचा निर्णय आल्यानंतर दार यांनी निर्णय दिला आणि पळत पळत ते मैदानाबाहेर गेले. दार यांच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली. पाहा हा व्हिडीओ...