नवी दिल्ली : ‘भारताच्या ‘अ’ संघाच्या प्रशिक्षकपदी असताना दौऱ्यावर आलेल्या प्रत्येक खेळाडूला मालिकेत एक तरी सामना खेळण्याची संधी मिळावी, याकडे मी लक्ष दिले. मी खेळत असताना, आमच्या वेळी असे व्हायचे नाही,’ असे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) निर्देशक राहुल द्रविड यांनी सांगितले.भारतीय क्रिकेटमधील युवा गुणवत्ता पुढे आणण्याचे श्रेय द्रविड यांना दिले जाते. भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यात व्यस्त असताना त्याचदरम्यान जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर भारताचा दुसरा संघ जाईल. या संघाला प्रशिक्षक म्हणून द्रविड यांचे मार्गदर्शन लाभेल. या संघाचे नेतृत्व अनुभवी फलंदाज शिखर धवन करेल.द्रविड यांनी सांगितले की, ‘मी खेळाडूंना आधीच सांगितले होते की, जर तुम्ही माझ्यासोबत ‘अ’ संघाच्या दौऱ्यावर आला आहात, तर एकही सामना न खेळता तुम्ही परतणार नाही. ज्युनिअर स्तरावर खेळत असताना माझे अनुभव वेगळे आहेत. ‘अ’ संघासोबत दौऱ्यावर जाऊन खेळण्याची संधी न मिळणे खूप वाईट अनुभव होता.’ द्रविड पुढे म्हणाला की, ‘तुम्ही चांगले प्रदर्शन करून ७००-८०० धावा काढता आणि नंतर संघासोबत दौऱ्यावर जाऊनही तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळत नाही. त्यानंतर निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी पुढील सत्रात पुन्हा ८०० धावा काढाव्या लागतात.’
...त्यावेळी आम्हाला त्यांचा हेवा वाटायचा
भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत द्रविड म्हणाला की, ‘भारतीय क्रिकेटपटूंना आज सर्वात तंदुरुस्त मानले जाते. मात्र एक काळ असा होता, जेव्हा आमच्याकडे तंदुरुस्तीचे आवश्यक ज्ञान नव्हते. आम्हाला आमच्याहून अधिक तंदुरुस्त असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा हेवा वाटायचा.’