भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) याचा पुन्हा एकदा पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रम, वकार युनिस व शोएब अख्तर यांच्याशी सामना झाला. पण, यावेळी क्रिकेटच्या मैदानावर नव्हे तर आगामी आंतरराष्ट्रीय लीजंड्स ट्वेंटी-२० लीगच्या समालोचन कक्षात हे भारत-पाकिस्तानचे खेळाडू समोरासमोर आले.
ILT20 ने आयोजित केलेल्या एक्स्पर्ट पॅनेल चर्चेत भारताचा वीरेंद्र सेहवाग, पाकिस्तानचा वसीम अक्रम, शोएब अख्तर व वकार युनिस हे समोरासमोर आले. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग हाही या चर्चासत्रात सहभागी झाला होता. या चर्चासत्रात सेहवाग व पाकिस्तानच्या तिन्ही गोलंदाजांमध्ये मजेशीर खटका उडाला. अख्तरने या खटक्याची सुरुवात करताना सेहवाग हा फिरकीपटूंनाच चांगला खेळू शकतो असे म्हणाला.
तो इथेच थांबला नाही. त्याने पुढे म्हणाला, लाजू नको वीरू.. मागच्यावेळेस जेव्हा तू आम्हा तिघांविरुद्ध खेळला होतात, तेव्हा आम्ही तुझा त्रिफळा उडवला होता. यावर सेहवाग गप्प बसला नाही आणि तो जसा मैदानावर गोलंदाजांची धुलाई करत होता, तशी त्याने इथे सुरू केली. तो म्हणाला, मी आता काँटॅक्ट लेन्स घालतो... जेणेकरून मला तुझा सुंदर चेहरा पाहता येईल.
त्यानंतर सेहवाग म्हणाला, या पॅनेल चर्चेत केवळ गोलंदाजांनाच परवानगी आहे का? काही हरकत नाही, तुम सबके लिए मै अकेला ही काफी हू.