कोलंबो : भारताचा हा खेळाडू ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये चपखल बसणारा. काही महिन्यांपूर्वी तो संघात नव्हता. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतींमध्ये त्याला संधी मिळाली. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने संघातील स्थान टिकवले. सध्या श्रीलंकेत सुरु असलेल्या निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेत त्याने षटकारांची पन्नाशी गाठली आहे.
निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेत भारताला पहिल्या सामन्यात श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले. पण त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर सहज मात केली. या सामन्यामध्येच भारताच्या सुरेश रैनाने षटकारांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताकडून ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये अर्धशतक पूर्ण करणारा भारताचा तो तिसरा फलंदाज ठरला आहे.
भारताकडून सर्वाधिक षटकार लगावण्याच्या यादीमध्ये युवराज सिंग अव्वल स्थानावर आहे. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये युवराजच्या नावावर 74 षटकार आहे. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये षटकार लगावण्यामध्ये युवराजनंतर भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माचा दुसरा क्रमांक आहे. रोहितच्या नावावर 69 षटकार आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रैनाचे नाव आहे. भारताच्या विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या आजी-माजी कर्णधारांना ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये अजूनही षटकारांची पन्नाशी गाठता आलेली नाही. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 46, तर कोहलीच्या नावावर 41 षटकार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक षटकारांचा विक्रम संयुक्तपणे न्यूझीलंडचा मार्टिन गप्तील आणि वेस्ट इंडिज यांच्या नावावर आहे. या दोघांच्याही खात्यामध्ये 103 षटकार आहेत.