Ind vs Sri Test, Virat Kohli: भारताचा फलंदाज विराट कोहलीसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरला. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली १०० वी कसोटी खेळत आहे. भारतीय संघाकडून १०० वी कसोटी खेळणारा तो १२ वा भारतीय खेळाडू ठरला आहे. कोहलीच्या याच यशाचा सन्मान करण्यासाठी आज सामना सुरू होण्याआधी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या हस्ते विराट कोहलीला १०० व्या कसोटीची स्पेशल कॅप देऊन सन्मानित करण्यात आलं.
कोहलीला जेव्हा ही स्पेशल कॅप देण्यात आली त्यावेळी स्टेडियमवर संपूर्ण भारतीय संघ तर उपस्थित होताच. पण त्यासोबत कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील होती. विराटनं त्याच्या आजवरच्या कसोटी प्रवासाबद्दल काही आठवणी सांगितल्या आणि बीसीसीआयनं दिलेल्या संधीबाबत आभार देखील व्यक्त केले. यावेळी पत्नी अनुष्काला मिठी मारत विराटनं आपला आनंद व्यक्त केला. पण क्रिकेट चाहत्यांना अनुष्काचं मैदानात उपस्थित असणं काही रुचलेलं दिसत नाही.
भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यातील पहिला सामना ४ मार्च म्हणजे आजपासून मोहालीत खेळविण्यात येत आहे. सामन्याच्या नाणेफेकीच्या १५ मिनिटांनंतर मैदानात कोहलीचा भारतीय संघ आणि बीसीसीआयकडून सन्मान करण्यात आला. यावेळी विराटची पत्नी अनुष्का शर्मा देखील त्याच्यासोबत उपस्थित होती. आता ट्विटवर याच मुद्द्यावरुन दोन मतप्रवाह सुरू झाले आहेत. अनुष्का शर्माचं असं भारतीय संघासोबत उपस्थित राहणं चूक की बरोबर यावर चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांचा एकापाठोपाठ एक ट्विट्सचा पाऊस पडण्या सुरुवात झाली आहे.
"कुटुंबीय सदस्य प्लेईंग एरियामध्ये जात नाही"भारतीय संघाच्या इतर खेळाडूंसोबत अनुष्का शर्मा प्लेईंग एरियामध्ये उपस्थित होती. यावर काहींनी आक्षेप नोंदवला आहे. प्लेइंग एरियामध्ये अनुष्का शर्मा उपस्थित राहण्याचं कारण काय होतं? असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. अनुष्का तिथं का उपस्थित आहे हा प्रश्न नाही. तर अनुष्का मैदानात का उपस्थित आहे? तिनं प्लेईंग एरियामध्ये येणं योग्य नाही, असं एका युझरनं म्हटलं आहे.
ईशांत शर्माचा दाखल देत कोहलीला पाठिंबाविराट कोहलीच्या चाहत्यांनी अनुष्काच्या उपस्थितीबाबत टीका करणाऱ्यांना ईशांत शर्माचं उदाहरण देत प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यापद्धतीनं आज अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत उपस्थित आहे ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी गोलंदाज ईशांत शर्माच्या १०० व्या कसोटीवेळी त्याची पत्नी देखील मैदानात उपस्थित होती. ईशांत आणि त्याच्या पत्नीचा फोटो शेअर करत विराटवर टीका करणाऱ्यांना चाहत्यांनी उत्तर दिलं आहे.