एकतर्फी झालेल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) धडाकेबाज विजय मिळवताना राजस्थान रॉयल्सचा ११२ धावांनी थुव्वा उडवला, या धमाकेदार विजयासह बंगळुरूने पाचव्या स्थानी कब्जा करताना प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल कायम राखली असून, राजस्थानची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे.
राजस्थानकडून शिमरोन हेटमायर याने एकाकी झुंज देत आक्रमक फटकेबाजी केली. मात्र अनुज रावतने केलेला शिमरन हेटमायरचा रनआऊट केले. अनुज रावतने महेंद्रसिंग धोनी स्टाईलने विकेटकिपींग करून षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या हेटमायरला ३५ धावांवर बाद केलं अन् आरसीबीचा विजय निश्चित केला. रावतच्या विकेटकिपींगचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
अनुज रावतच्या विकेटकिपिंग करणाऱ्या हँडग्लोव्ह्जवर महेंद्रसिंग धोनीची सही असल्याचे देखील काही फोटोंमधून दिसून येत आहे.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ५ बाद १७१ धावा केल्यानंतर राजस्थानला १०.३ षटकांत केवळ ५९ धावांमध्ये गुंडाळले. बेन पार्नेलच्या अचूकतेपुढे राजस्थानच्या तगड्या फलंदाजीला सुरुंग लागला, त्याने जोस बटलर, कर्णधार संजू सॅमसन आणि जो रुट या तीन प्रमुख फलंदाजांना स्वस्तात बाद करत राजस्थानचे कंबरडे मोडले. पहिल्या दोन षटकांत यशस्वी जैस्वाल आणि बटलर हे राजस्थानचे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले सलामीवीर बाद झाल्याने राजस्थानची हवा निघाली. यानंतर ठराविक अंतराने राजस्थानला धक्के बसले. सात षटकांतच राजस्थानची ६ बाद ३१ धावा अशी अवस्था करत बंगळुरूने सामन्याचा निकाल स्पष्ट केला.