पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदनं शनिवारी पाकिस्तान सुपर लीगमधून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कमबॅक केले. कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तान सुपर लीगचे प्ले ऑफचे मार्चमध्ये होणारे सामने स्थगित करण्यात आले होते. त्यांना कालपासून सुरुवात झाली. यावेळी आफ्रिदीही मैदानावर उतरला, पण त्याच्या विचित्र हेल्मेटनं सर्वांचे लक्ष वेधलं. जीवाशी खेळ कशाला? असा सवाल नेटिझन्सनं केला.
आफ्रिदीलाही कोरोना झाला होता आणि त्यावर मात करून तो मैदानावर उतरला. शनिवारी त्यानं PSLच्या क्वालिफायरमध्ये मुल्तान सुल्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आणि इमाद वासीमच्या कराची किंग्सविरुद्ध फलंदाजीला आला. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आफ्रिदीनं अर्शद इक्बालच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचला. त्यानं 12 चेंडूंत 12 धावा केल्या. तसेच 40 वर्षीय आफ्रिदीनं 13व्या षटकात इफ्तिखार अहमदची विकेट घेतली. दोन्ही संघांना 141 धावांवर समाधान मानावे लागल्यानं सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला. कराची किंग्सनं हा सामना जिंकला.
शाहिद आफ्रिदीच्या हेल्मेटची चर्चा आफ्रिदीच्या हेल्मेटला रक्षात्मक गार्ड नव्हते आणि या हेल्मेटचे डिझाईन असं होतं की त्यातून चेंडू सहज पास होऊन आफ्रिदीला लागला असता.