नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा यांना भारतातील कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी दोन कोटी रुपयांचे दान केले. सात कोटी उभारण्याचे दोघांचेही लक्ष्य असून, केटो या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा पैसा उभारण्यात येत आहे.
विराट आणि अनुष्का यांच्यातर्फे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले, त्यात ‘भारतातील कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी सात कोटी रुपये जमा करण्याची योजना असून, क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या (केटो) माध्यमातून मोहीम राबिवण्यात येत आहे. दोघांनी आपल्यातर्फे दोन कोटी रुपये दिले. केटोची मोहीम सात दिवस चालणार आहे. यातून येणारा निधी एसी टी ग्रांट्स नावाच्या संस्थेकडे दिली जाईल.ही संस्था ऑक्सिजन तसेच उपचारासाठी लागणाऱ्या सुविधा उभारण्याचे काम करते.’
कोहली म्हणाला,‘देश सध्या कठीण परिस्थितीत आहे. एकजूट होऊन लोकांचा जीव वाचविण्याची गरज आहे. लोकांचे दु:ख मागच्या वर्षीपासून पाहत असल्याने मी आणि अनुष्काने लोकांना मदत करण्यासाठी काम करण्याचे ठरवले आहे. गरजूंच्या मदतीसाठी हा निधी उपयुक्त ठरावा, अशी आमची धडपड आहे. प्रत्येक गरजवंताला मदत होईल, या विश्वासाने आम्ही निधी उभारण्याचा संकल्प केला. देशातील लोक मदतीसाठी पुढे येतील आणि एकोप्याचे दर्शन घडवून आम्ही कोरोनावर यशस्वीरीत्या मात करू, अशी आशा बाळगूया.’