Join us  

दोन तासात खेळ खल्लास; लीड्स कसोटीत भारताचा एक डाव ७६ धावांनी पराभव

मालिकेत १-१ बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 9:29 AM

Open in App

लीड्स : भारतीय संघ इंग्लंडच्या शानदार गोलंदाजीच्या समोर शनिवारी येथे तिसऱ्या कसोटीत चौथ्या दिवशी उपहाराच्या आधी दुसऱ्या डावात २७८ धावातच सर्वबाद झाला. भारतीय संघाला एक डाव आणि ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर दोन तासातच भारतीय संघाचा डाव आटोपला. 

लॉर्डसवरील सामन्यात शानदार विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचा पहिला डाव फक्त ७८ धावांतच आटोपला होता. त्याचा परिणाम पूर्ण खेळावर दिसला. गोलंदाजांवर या कमी धावसंख्येचा दबाव दिसला. त्याचा फायदा घेत इंग्लंडने पहिल्या डावात ४३२ धावा करत ३५४ धावांची मोठी आघाडी घेतली होती. भारतीय संघाने शुक्रवारी तिसऱ्या दिवशी ८० षटकांत दोन बाद २१५ धावा करत आशा निर्माण केली होती.

चौथ्या दिवशी खेळपट्टी सपाट होती. फलंदाजीसाठी अनुकूलदेखील होती. भारतीय फलंदाजांना फक्त पहिला एक तास टिकून खेळण्याची गरज होती. मात्र, त्यांना तसे करता आले नाही. संघाने उपहाराच्या आधी ६३ धावांतच सलग आठ बळी गमावले. आणि संघ ९९.३ षटकांत २७८ धावांवर बाद झाला.  आता चौथा कसोटी सामना २ ते ६ सप्टेंबरपर्यंत द ओव्हलमध्ये होणार आहे. 

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज ओली रॉबिन्सन हा सर्वात यशस्वी राहिला. त्याने दुसऱ्या डावात ६५ धावा देत पाच बळी घेतले, तर संपूर्ण सामन्यात सात बळी घेतले. त्याला सामनावीराचा बहुमान देण्यात आला.  रॉबिन्सनने चौथ्या दिवशी चार भारतीय खेळाडूंना बाद केले. त्यात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांचे महत्त्वपूर्ण बळी होते, तर क्रेग ओव्हरटनने तीन तर जेम्स अँडरसन आणि मोईन अली यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. भारताने दोन बाद २१५ धावांनी खेळायला सुरुवात केली. आणि एकही धाव न करताच पुजारा बाद झाला.   कोहली आणि पुजारा यांना तीन षटकांत एकही धाव करता आली नाही. 

शतकापासून ९ धावांनी दूर असलेल्या पुजारा याने रॉबिन्सनचा एक चेंडू सोडून दिला; पण तोच चेंडू त्याच्या पॅडवर आदळला. कोहलीने रॉबिन्ससन चौकार लगावत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.  भारतीय फलंदाजांनी नव्या चेंडूवर टिकून खेळणे अपेक्षित होते. मात्र, यानंतर लगेचच रहाणेने विकेट गमावली.  त्यानंतर जडेजा वगळता इतर फलंदाजांना फार वेळ टिकता आले नाही.

इंग्लंडची शानदार गोलंदाजी!

धावसंख्येमुळे दबाव खूपच वाढला होता. इंग्लंडने मोठी आघाडी घेतली होती. आणि त्यासोबतच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. शुक्रवारी आम्ही चांगला खेळ केला होता. मात्र शनिवारी इंग्लंडच्या गोलंदाजांनी संधीच दिली नाही. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. 

भारत पहिला डाव ७८ धावाइंग्लंड पहिला डाव ४३२ धावा

भारत दुसरा डाव एकूण ९९.३ षटकांत सर्व बाद २७८ धावा, रोहित शर्मा पायचीत गो. रॉबिन्सन ५९, के.एल. राहुल झे. बेअरस्टो गो. ओव्हरटन ८, चेतेश्वर पुजारा पायचीत गो. रॉबिन्सन ९१, विराट कोहली झे. रुट गो.           रॉबिन्सन ५५, अजिंक्य रहाणे            झे. बटलर गो. अँडरसन १०, ऋषभ पंत झे. ओव्हरटन गो. रॉबिन्सन १, रवींद्र जडेजा झे. बटलर गो.  ओव्हरटन ३०, मोहम्मद शमी गो. अली ६, इशांत शर्मा झे. बटलर गो. रॉबिन्सन २, जसप्रीत बुमराह          नाबाद १, मोहम्मद सिराज झे. बेअरस्टो गो.ओव्हरटन ०,              अतिरिक्त १५

गडी बाद क्रम १/३४, २/११६, ३/२१५, ४/२३७, ५/२३९,६/२३९,७/२५४,८/२५७,९/२७८,१०/२७८

गोलंदाजी अँडरसन २६-११-६३-१, रॉबिन्सन २६-६-६५-५, ओव्हरटन १८.३-६-४७-३, कुर्रन ९-१-४०-०, मोईन अली १४-१-४०-१, रुट ६-१-१५-०- विराट कोहली

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहली
Open in App