नवी दिल्ली : यूएईत आयपीएलचे १३ वे पर्व नुकतेच यशस्वी झाल्यानंतर २०२१ च्या एप्रिल- मे महिन्यात १४ व्या पर्वाचे आयोजन करण्याची तयारी बीसीसीआयने सुरू केली आहे. यानिमित्त दोन नवे संघ मैदानात उतरविण्याचीही तयारी असल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. आगामी २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत (एजीएम) यासदर्भात अंतिम निर्णय होईल. याविषयी राज्य संघटनांचे मत जाणून घेतले जाणार आहे.
नव्या तीन राष्ट्रीय निवडकर्त्यांचा शोध आणि आयसीसीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चेहऱ्याचादेखील आमसभेत शोध घेतला जाईल. सूत्रानुसार ही जबाबदारी जय शाह यांच्यावर सोपविली जाण्याची शक्यता आहे. बैठकीच्या अजेंड्यात नव्या उपाध्यक्षाची निवडणूक देखील ठेवण्यात आली आहे. बीसीसीआयने आमसभा बोलविण्याआधी सर्व राज्य संघटनांना २३ मुद्दे पाठविले आहेत. सचिव जय शाह यांनी दोन डिसेंबर रोजी परिपत्रक काढले. त्यानुसार वार्षिक सभेत चर्चा होणार आहे. यामध्ये माहिम वर्मा यांची गेल्यावर्षी उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली होती. मात्र, त्यांनी राजीनामा दिला आहे. गांगुली आणि शहा यांना आपल्या पदावर काम करण्यासाठी कार्यकाळ वाढवून देण्यात यावा यासाठीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ९ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.