नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडून टाकण्याची मागणी जोर धरू लागली. अगदी वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर भारतानं बहिष्कार टाकण्याचा सूर उमटत आहे. देशातील काही राज्य क्रिकेट संघटनांनी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या मुख्यालयातून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या प्रतिमाही काढल्या आणि पुलवामा हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते.
हरभजन सिंग, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांच्यासह आजी- माजी खेळाडूंनी भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळू नये असे मत व्यक्त केले होते. यामध्ये आता पद्मश्री पुरस्कार विजेता क्रिकेटपटू गौतम गंभीरही सहभागी झाला आहे. 2011चा वन डे वर्ल्ड कप विजेत्या स्पर्धेतील नायक आणि 2007 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य गंभीरीने केवळ वर्ल्ड कप स्पर्धेतच नव्हे, तर भारताने आयसीसीच्या सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये पाकविरुद्धच्या सामन्यांवर बहिष्कार घालावा अशी मागणी केली आहे.
2012-13 मध्ये पाकिस्तानचा संघ तीन वन डे आणि दोन ट्वेंटी-20 सामना खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. त्यानंतर उभय संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. मात्र, पाकिस्तानविरुद्ध भारताने ठाम भूमिका घ्यावी आणि 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत दोन गुणांचा विचार न करता पाकविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, असे मत गंभीरने व्यक्त केले. तो म्हणाला,''वर्ल्ड कपच नव्हे, तर आशिया चषक स्पर्धेतही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर भारताने बहिष्कार घालावा. दोन गुण गमावले तरी चालेल. संपूर्ण देश भारतीय खेळाडूंच्या पाठीशी उभा राहिल आणि उपांत्य किंवा अंतिम फेरीत प्रवेश न केल्यामुळे खेळाडूंना कोणी दोषी धरणार नाही. दोन गुणांपेक्षा माझ्यासाठी देशाचा जवान महत्त्वाचा.''
दरम्यान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते रविवारी गंभीरला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. तो पुढे म्हणाला,'' काही लोकं म्हणतात खेळ आणि राजकारण यांना वेगळं ठेवा. पण, देशाच्या जवानापेक्षा माझ्यासाठी काही महत्त्वाचे नाही. त्यामुळे पाकसोबतचे सर्व व्यवहार थांबवायला हवे.''
Web Title: Two points aren't that important, for me jawans are more important than any cricket game, Gautam Gambhir
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.