मुंबई : भारताच्या 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावून देणाऱ्या अथर्व अंकोलेकरची मुंबईच्या संघात निवड झाली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. भारताचा डाव 106 धावांत गुंडाळल्यानंतर बांगलादेश सहज विजय मिळवून आशिया चषक नावावर करेल असा अंदाज होता. बांगलादेशने जिद्द सोडली नाही आणि अखेरपर्यंत खिंड लढवली. मात्र, अवघ्या 5 धावांनी त्यांना जेतेपदानं हुलकावणी दिली. या सामन्यात मुंबईकर अथर्वने 28 धावांत पाच विकेट्स घेतल्या.
विजय हजारे चषक स्पर्धेसाठीच्या मुंबईच्या 17 सदस्यीय संघात अथर्वने स्थान पटकावले आहे. अथर्वने आतापर्यंत एकही प्रथम श्रेणी आणि लिस्ट A सामना खेळलेला नाही. पण, आता तो विजय हजारे चषक स्पर्धेत मुंबईकडून पदार्पण करू शकतो. या संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. मुंबईचे सर्व सामने बंगळुरु येथे होणार आहेत.
मुंबईचा संघ - श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार ), जय बिस्ट, आदित्य तरे, एकनाथ केरकर, धवल कुलकर्णी, सर्फराज खान, शिवम दुबे, शुभम रांजणे, तुषार देशपांडे, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, शार्दूल ठाकूर, सिद्धेश लाड, यशस्वी जैस्वाल, कृतिक हनगवाडी, शशांक अत्तार्डे.