संतोष मोरबाळे।
अहमदाबाद : शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला यू.पी. योद्धाविरुद्ध पटना पायरेट्सचा सामना बरोबरीत सुटला. शेवटच्या क्षणी यू.पी.च्या खेळाडूंनी केलेल्या चुकांमुळे आघाडी असतानाही त्यांना बरोबरीत समाधान मानावे लागले. पटनाचा कर्णधार प्रदीप नरवालने सर्व कौशल्य पणास लावत संघाला पराभवाच्या दारातून परत आणले.
प्रदीप नरवाल, विशाल माने, मोनू गोयात असे दिग्गज खेळाडू संघात असतानाही पटना पायरेट्ला नितीन तोमरच्या नेतृत्वाखालील यू.पी. योद्धा संघाने पहिल्या सत्रात आघाडी मिळवू दिली नाही. पटनाचा कर्णधार प्रदीप नरवाल याला जास्तीत जास्त वेळ मैदानाबाहेर ठेवण्याचे यू.पी.चे डावपेच पहिल्या सत्रात यशस्वी ठरले. प्रदीपने पहिल्याच चढाईत गुण मिळवून चांगली सुरुवात केली. मात्र यू.पी.चा कर्णधार नितीन तोमर याने लगेच परतफेड करत बरोबरी साधली. त्यानंतर महेश गौड, रिशांक देवाडिगा व नितीन यांनी पटनाला आघाडी मिळवू दिली नाही.
प्रदीप मैदानाबाहेर असताना मोनू गोयात याने पटना पायरेट्ची आघाडी सांभाळली. पूर्वार्ध संपला तेव्हा पटना ११ तर यू.पी.चे १३ गुण झाले होते. आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात यू.पी.च्या खेळाडूंनी काही चुका केल्या. याचा फायदा घेत पटनाच्या मोनू गोयात याने गुणांची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. ३ गुणांची आघाडी कायम ठेवण्याचा यू.पी.च्या खेळाडूंचे डावपेच यशस्वी ठरत होते. ऐन मोक्याच्या वेळी प्रदीप नरवालची पकड करत यू.पी.ने सुपर टॅकलसह ३ गुण मिळवले. यु.पी. ने ७ गुणांची आघाडी घेत पटनावर दबाव कायम ठेवला. पायरेट्सच्या खेळाडूंनी सुपर टॅकल करत ही आघाडी कमी केली. त्यानंतर प्रदीपने आपला अनुभव पणास लावत सामना बरोबरीत आणला. यू.पी.च्या खेळाडंूनी अंतिम क्षणी केलेल्या चुका पटनासाठी फायदेशीर ठरल्या.
गुजरात जायंटकडून जयपूर पिंक पॅँथर्स पराभूत
सांघिक खेळावर भर देणाºया गुजरात फॉर्च्युन जायंट्सने यशाची मालिका कायम राखली. गुजरातने जयपूरचा २७-२० असा पराभव केला. सचिन तवर व रोहित गुलिया या छोट्या चणीच्या खेळाडूंनी आपली उपयुक्तता सिद्ध करत जयपूरच्या खेळाडूंची लय बिघडवली. पूर्वार्धात १०-१० असा बरोबरीत असलेला सामना उत्तरार्धात रंगला. सामन्याला आठ मिनिटे शिल्लक असताना गुजरातने जयपूरवर लोण चढवत आठ गुणांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. जयपूरच्या जसवीरला आज सूर गवसला नाही. रोहित व सचिन यांच्या बरोबरीने परवेश व फजल यांनी भक्कम बचाव करत संघाच्या विजयात मोठा हातभार लावला. जसवीर व मनजीत यांचे अपयशच जयपूरच्या पराभवास कारणीभूत ठरले.
Web Title: U P. Stopping the warrior
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.