भारतात सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत India vs Pakistan असा सामना होण्याचा अंदाज बांधला जात आहे. उभय संघांमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात रोहित शर्मा अँड टीमने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा हे संघ समोरासमोर कधी येतात याची उत्सुकता आहे. पण, त्याआधी एक मोठी बातमी समोर येत आहे. १० डिसेंबरला भारत-पाकिस्तान यांच्यात वन डे मॅच होणार आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेने आज त्याची घोषणा केली आहे. ACC ने आज १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आणि भारत व पाकिस्तान यांना एकाच गटात स्थान दिले गेले आहे. अ गटात भारत, पाकिस्तान यांच्यासह अफगाणिस्तान व नेपाळ आहे, तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका, यूएई व नेपाळ असे चार संघ आहेत. ८ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत दुबईत ही स्पर्धा पार पडणार आहे. १० डिसेंबरला भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.