Join us  

महाराष्ट्राचा 'युवराज' अथर्व तायडेची गोष्ट, पराक्रम पाहून व्हाल थक्क!

U19 India vs Sri Lanka: श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध कसोटी मालिकेत सलग दोन सामन्यांत शतक झळकावणारा विदर्भाचा अथर्व तायडे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

By स्वदेश घाणेकर | Published: July 25, 2018 9:17 AM

Open in App
ठळक मुद्देविदर्भाकडून तिहेरी शतक करणारा पहिला खेळाडू. 

श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी भारताचे युवा शिलेदार कोलंबोत दाखल झाले. अपेक्षेपेक्षा अधिक सरस कामगिरी करून त्यांनी पहिली कसोटी जिंकलीही आणि दुसऱ्यातही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. या दौऱ्याची चर्चा सुरू झाली ती अर्जुन तेंडुलकरच्या नावाने, पण आतापर्यंत या दौऱ्यावर छाप पाडलीय ती दुसऱ्याच मराठमोळ्या खेळाडूने. सलग दोन सामन्यांत शतक झळकावणारा विदर्भाचा अथर्व तायडे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

श्रीलंका दौऱ्यावरील पहिल्या लढतीत ११३ धावा कुटणाऱ्या अथर्वने मंगळवारी दुसऱ्या सामन्यात १७७ धावांची तुफानी खेळी केली. या सलामीवीराने १७२ चेंडूत २० चौकार आणि ३ षटकार खेचले. "१४ वर्षांचा असताना अथर्व माझ्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी आला होता. जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी, यामुळेच तो एक एक टप्पा सर करत गेला. परिस्थितीनुसार तो आपल्या फलंदाजीच्या शैलीत बदल करतो. राष्ट्रीय स्पर्धेतील एका सामन्यात त्याने चिवट खेळ करून ९० षटके खेळून काढली आणि फक्त ८० धावा केल्या. तो एक फरफेक्ट पॅकेज आहे आणि पुढील मोसमात तो रणजी स्पर्धेत पदार्पण करेल, असा मला विश्वास आहे. विदर्भ क्रिकेटला आज त्याचा सार्थ अभिमान वाटतो, " अशी प्रतिक्रिया अथर्वचे प्रशिक्षक उस्मान घानी यांनी दिली.

(अंडर १९ कसोटी : श्रीलंकेविरुद्ध तायडे, शाह यांची शतकी खेळी)

अथर्व हा मुळचा अकोल्याचा. जानेवारीत झालेल्या कूचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत ट्रिपल सेंच्युरी झळकावून अथर्व (३१३) प्रसिद्धीझोतात आला. या खेळीने त्याला थेट भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंग याच्या बाजूला बसवले. १९ वर्षांखालील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत तिहेरी शतक झळकावणारा युवराज ( ३५८; १९९९)  नंतरचा तो दुसरा खेळाडू ठरला.  वेगाने आग ओकणारे गोलंदाज असले तरी मोठ्या आत्मविश्वासने अथर्व त्यांना सामोरे जातो. परिस्थितीनुसार आपल्या खेळीत विविधता आणण्याची खुबी त्यात आहे. 

अथर्वने ९व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केली. त्याचे वडील ययाती हे प्राध्यापक आहेत आणि त्याने अथर्वचे स्वप्न पूर्ण करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांनी घराच्या मागच्या बाजूला मोकळ्या जागेत त्यांनी अथर्वच्या सरावासाठी खेळपट्टी तयार केली आणि बॉलिंग मशिनही आणली. त्यानेही वडिलांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. त्याच्या नेतृत्वाखाली विदर्भाने २०१३-१४ सालची राजसिंग डुंगरपूर चषक ( १४ वर्षांखालील) उंचावला. 

अथर्वच्या कामगिरीवर एक नजर- विनू मंकड १९ वर्षांखालील स्पर्धेत पाच सामन्यांत एकूण ३९१ धावा - विदर्भाकडून तिहेरी शतक करणारा पहिला खेळाडू. - सहकारी यश राठोडने लीग सामन्यात नोंदवलेला २२३ धावांचा विक्रम अथर्वने मोडला.- प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विदर्भाच्या समीर गुज्जर यांनी १९९१-९२ च्या रणजी करंडक स्पर्धेत मध्य प्रदेशविरूद्ध २२१ धावा केल्या होत्या.

टॅग्स :क्रिकेटक्रीडा