U19 World Cup Final, India vs England Live Updates : भारताने पाचव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला. अंतिम सामन्यात त्यांनी इंग्लंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला. राज बावाची ( Raj Bawa) अष्टपैलू ( ५ विकेट्स व ३५ धावा), शेख राशिद व निशांत सिंधू यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं पाचव्यांदा वर्ल्ड कपच्या झळाळत्या ट्रॉफीवर देशाचं नाव कोरलं. यश धुल याच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या या यशानंतर BCCIने खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी या वर्ल्ड कप विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला ४० लाख आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २५ लाख बक्षीस रक्कम देणार असल्याचे जाहीर केले.
भारताच्या युवा गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडचा डाव १८९ धावांवर गुंडाळला. राज बावा ( Raj Bawa) आणि रवी कुमार ( Ravi Kumar) या दोघांनी मिळून ९ विकेट्स घेतल्या. राज बावाने ९.५ षटकांत ३१ धावांत ५, तर रवी कुमारने ३४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. रवी कुमारने इंग्लंडच्या सुरुवातीच्या दोन फलंदाजांना बाद केल्यानंतर राज बावाने मधल्या फळीला नेस्तानाबुत करताना चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर रवी कुमारने इंग्लंडचा सेट फलंदाज जेम्स रेवला माघारी पाठवले आणि राज बावाने अखेरची विकेट घेत इतिहास रचला. ६ बाद ६१ अशा अवस्थेतून जेम्सने इंग्लंडचा डाव सावरताना ८ व्या विकेटसाठी जेम्स सेल्ससह ( James Sales ) ९३ धावांची विक्रमी भागीदारी केली. ११६ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने ९५ धावा करणारा जेम्स रेवचा अफलातून झेल कौशल तांबेने टिपला. सेल्स ३४ धावांवर नाबाद राहिला. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये ५ विकेट्स घेणारा तो भारताचा पहिला आणि जगातील दुसरा गोलंदाज ठरला.
प्रत्युत्तरात, भारताचा सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी ( ० ) पहिल्याच षटकात बाद झाला. हर्नूर सिंग ( २१) व शेख राशिद यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करून डाव सारवला. त्यानंतर शेख व कर्णधार यश धुल यांचा सुरेख खेळ पाहायला मिळाला. पण, यावेळेस धुलला ( १७) मोठी खेळी साकारता आली नाही. शेखही ८४ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ५० धावांवर माघारी परतला. सामन्याला कलाटणी मिळाली असे वाटत असताना राज बावा व निशांत सिंधू यांनी पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करताना संघाला विजयासमीप पोहोचवले. गोलंदाजीत पाच विकेट्स घेणाऱ्या बावाने ३५ धावा केल्या. निशांतने नंतर फटकेबाजी केली, परंतु विजयासाठी १४ धावांची गरज असताना कौशल तांबेची ( १) विकेट पडली. निशांतने मोक्याच्या क्षणी अर्धशतक झळकावून भारताचा विजय पक्का केला. भारताने ४७.४ षटकांत ६ बाद १९५ धावा करून विजय पक्का केला.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह यांनी संघाचे कौतुक करताना खेळाडूंसाठी बम्पर घोषणा केली.
Web Title: U19 World Cup Final, IND vs ENG Live Updates : BCCI has announced 40 Lakh for each Indian player and 25 Lakh for support staff for winning U-19 World Cup 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.