मुंबईः भारताने 'अंडर-१९' वर्ल्ड कप जिंकला तो क्षण पृथ्वी शॉ आणि संपूर्ण संघासाठीच अविस्मरणीय होता-आहे. त्या सुवर्णक्षणी जगज्जेता कर्णधार पृथ्वी शॉला सगळ्यात आधी कोण आठवलं?, हे कळलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल वाटणारा अभिमान आणखी वाढेल. कारण, ही व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून त्याच्या संघाचे 'महागुरू' राहुल द्रविड ही आहे. खुद्द पृथ्वी शॉने अत्यंत प्रांजळपणे त्याच्या प्रिय राहुल सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
देशासाठी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या पृथ्वी शॉने आज 'लोकमत'च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली आणि वेगवेगळ्या टीमसोबत मनमोकळा संवाद साधला. त्यावेळी, विरार ते वर्ल्ड कपपर्यंतचा प्रवास आणि पुढचं ध्येय, याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रश्नांना त्यानं उत्तरं दिली. त्यातून त्याचा नम्रपणा, संयम, जिद्द-चिकाटी सहज जाणवली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आदर्श मानणाऱ्या पृथ्वीला राहुल सरांबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे, याची जाणीव एकाच उत्तरातून झाली.
वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात हार्विक देसाईने 'विनिंग शॉट' मारला, तेव्हा माझ्या डोळ्यांपुढे राहुल सर उभे राहिले. त्यांच्या हातात मला वर्ल्ड कप द्यायचा होता, असं पृथ्वीने सांगितलं. राहुल सरांच्या तालमीत तयार झालेला पृथ्वी, शिस्त, सराव, फिटनेसबद्दल खूप आग्रही आहे. त्यामुळेच आपले पाय कायम जमिनीवरच राहतील, याबद्दल त्याला खात्री आहे.
आयपीएल स्पर्धेत पृथ्वी दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळणार आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळण्यास तो नक्कीच उत्सुक आहे. पण, तुला दिल्लीपेक्षा मुंबई इंडियन्सकडून खेळायला आवडलं असतं का, या प्रश्नावर त्याने सूचक उत्तर दिलं. आयपीएलमध्ये सगळेच वेगवेगळ्या संघांकडून खेळतात. मुंबईचा असल्याने मुंबईतून खेळायला आवडलंच असतं, त्यांनी मला संघात घेण्याचा प्रयत्नही केला, पण काही हरकत नाही, असं तो म्हणाला. पृथ्वीचं पुढचं लक्ष्य टीम इंडियाकडून खेळणं हेच आहे आणि त्यासाठी फिटनेस आणि सरावावर त्यानं लक्ष केंद्रीत केलंय.
पृथ्वी शॉसोबतचं फेसबुक लाइव्हः