गतविजेत्या टीम इंडियानं 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजयाची नोंद केली. मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियानं तोच फॉर्म कायम राखताना जपानचा धुव्वा उडवला. या सामन्यात टीम इंडियानं जपानचा संपूर्ण संघ 41 धावांत तंबूत पाठवला. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील ही आतापर्यंतची दुसरी नीचांकी खेळी ठरली. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं 2004च्या वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंड संघाला 22 धावांत तंबूत पाठवले होते.
नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा कर्णधार प्रियम गर्गनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांची त्याचा या निर्णय योग्य ठरवला. वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या जपानच्या फलंदाजांना त्यांनी दुहेरी धाव करण्यापासून रोखले. सलामीवीर मार्कस थुर्गाटे ( कर्णधार ) आणि शू नोगोची यांनी पाच षटकं खिंड लढवली. कार्तिक त्यागीनं जपानला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या नील दातेलाही पहिल्याच चेंडूवर कार्तिकनं माघारी पाठवले. त्यानंतर जपानची पडझड कायम राहिली. जपानच्या पाच फलंदाजांना तर भोपळाची फोडता आला नाही.
केंटो दोबेल व मॅक्सिमिलियन क्लेमेंट्स (5) यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्तिकनं ही जोडी फोडली. दुसऱ्या बाजूनं रवी बिश्नोईनं जपानच्या चार फलंदाजांना 4 धावांत माघारी पाठवले. पहिल्या दहा षटकांत जपानचे सहा फलंदाज माघारी परतले होते. आकाश सिंगने दोन आणि विद्याधर पाटीलने एक विकेट घेतली.