भारताच्या यंग ब्रिगेडनं मंगळवारी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुळ चारली. युवा वर्ल्ड कप स्पर्धेतील उभय संघांमधील इतिहास पाहता पाकिस्तानचे पारडे जड होते. पण, तगड्या प्रतिस्पर्धींना धुळ चारून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या टीम इंडियाचा झंझावात रोखणं हे अवघडच. तरीही पाकिस्तानच्या माजी दिग्गजांकडून नेहमीप्रमाणे आमचीच पोरं जिंकणार, असा छातीठोक दावा केला जात होता. त्यांचा हा दावी किती पोकळ ठरला हे सर्वांना कालच्या सामन्यात पाहिलेच. पाकिस्तान संघाला दोनशे धावांचा पल्लाही गाठता आला नाही आणि प्रत्युत्तरात उतरलेल्या टीम इंडियाच्या एकाही शिलेदाराला त्यांना बाद करता आले नाही.
IND - PAK : भारताचा सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश, पाहा कधी पटकावले जेतेपद...
पाकिस्तानचे 173 धावांचे लक्ष्य टीम इंडियानं यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांस सक्सेना यांनी सहज पार केले. यशस्वीनं 113 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकार खेचून नाबाद 105 धावा केल्या. सक्सेनानं 99 चेंडूंत 6 चौकारांसह नाबाद 59 धावा केल्या. या जोडीनं 16 वर्षांपूर्वीचा 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विक्रम मोडला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 176 धावांची भागीदारी केली. 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतासाठी सर्वोत्तम भागीदारी करणारी तिसरी जोडी ठरली. त्यांनी 2004 मध्ये शिखर धवन आणि रॉबीन उथप्पा यांचा 175 ( वि. स्कॉटलंड) धावांचा विक्रम मोडला. या विक्रमात एम बिस्ला/ पार्थिव पटेल ( 183 धावा वि. कॅनडा, 2002) आणि एम कार्ला/पृथ्वी शॉ ( 180 वि. ऑस्ट्रेलिया, 2018) हे आघाडीवर आहेत.या सामन्यात यशस्वीच्या खेळीनं पाक गोलंदाजांना हतबल केले. पाणीपुरी विकून क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या यशस्वी मुंबईकरासमोर पाकच्या गोलंदाजांनी शरणागती पत्करली.
यशस्वीचा संघर्षमय प्रवास...मुंबईच्या आझाद मैदान येथील मुस्लीम युनायटेड क्लबच्या तंबूत ग्राऊंड्समनसोबत यशस्वी तीन वर्ष राहिला. एका डेअरी शॉपमध्ये तो काम करायचा, परंतु क्रिकेट खेळून पार थकून जायचा. त्यामुळे काम करताना त्याला झोप यायची. त्यामुळे त्याला मालकानं कामावरून काढून टाकलं होतं. फक्त एक यशस्वी क्रिकेटपटू बनायचंय हे एकच ध्येय उराशी बाळगून तो झटत राहिला. उत्तर प्रदेशातील भदोही गावातील हा युवा खेळाडू. त्याच्या वडिलांचं गावाकडं एक लहानस दुकान आहे. क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं मुंबई गाठली.
मुंबईत तो त्याच्या काकांकडे रहायचा, पण घर छोटं असल्यानं सर्वांना तेथे राहणे अवघड जायचे. त्याच्या काकांनी मुस्लीम युनायटेड क्लबच्या मालकांकडे यशस्वीला क्लबमध्ये रहायला देण्याची विनंती केली. त्यानंतर यशस्वी क्लबच्या तंबूत तीन वर्ष राहिला. त्यानं हे त्याच्या घरच्यांना कधीच कळू दिले नाही. त्यांना कळले असते तर यशस्वीची क्रिकेट कारकिर्द तेथेच संपुष्टात आली असती. त्याचे वडील मुंबईला पैसे पाठवायचे, परंतु ते पुरेसे नव्हते. म्हणून यशस्वी आझाद मैदान येथील राम लीला येथे पाणीपूरी व फळ विक्री करायचा. अनेकदा तर त्याला रिकामी पोटी झोपावं लागलं आहे.