नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचे बिगुल वाजले आहे. सध्या सुपर-१२ मध्ये प्रवेश करण्यासाठी सामने खेळवले जात आहेत. आज झालेल्या पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेचा ५५ धावांनी धुव्वा उडवला. तर दुसऱ्या सामन्यात नेदरलॅंडने शानदार विजय मिळवला. सुपर-१२ ची फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघाला किमान २ सामने जिंकणे गरजेचे आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात नेदरलॅंडच्या संघाने विजय मिळवून विश्वचषकाच्या मोहिमेत विजयी सलामी दिली. अखेरच्या षटकात नेदरलॅंडला विजयासाठी ६ धावांची आवश्यकता होती. अखेर नेदरलॅंडने १९.५ षटकांत ७ बाद ११२ धावा करून विजय मिळवला.
तत्पुर्वी, यूएईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यूएईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १११ धावा केल्या. आपला पहिला सामना खेळत असलेल्या १६ वर्षीय अयान खानला या सामन्यात साजेशी खेळी करता आली नाही. त्याने ७ चेंडूत ५ धावा केल्या आणि बाद झाला. नेदरलॅंडच्या घातक गोलंदाजीसमोर यूएईचे फलंदाज गारद झाले. बास डी लीडे (३), फ्रेड क्लासेन (२), रूलोफ़ वैन डेर मेर्वे आणि टिम प्रिंगल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेऊन यूएईला केवळ १११ धावांवर रोखले.
नेदरलॅंडची विजयी सलामी
यूएईच्या आक्रमक गोलंदाजीसमोर नेदरलॅंडच्या फलंदाजांना धावा काढणे कठीण होत होते. यूएईकडून जुनैद सिद्दिकीने सर्वाधिक (३) बळी पटकावले, तर बासिल हमीद, आयान अफजल खान, मेयप्पन, झहूर खान यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर नेदरलॅंडने ३ बळी आणि १ चेंडू राखून विजय मिळवला.
टी-२० विश्वचषकात सुपर-१२ फेरी गाठण्यासाठी आठ संघांमध्ये सामने खेळवले जात आहे. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-१२ सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील.
पहिला राउंड अ गट - नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.
ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे.
सुपर-१२ फेरीगट १ - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.
गट २ - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"