नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. एकीकडे या स्पर्धेतील सराव सामने खेळवले जात आहेत, तर दुसरीकडे सुपर-12 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 8 संघ आमनेसामने आहेत. आज राउंड फेरीतील अ गटातील श्रीलंका आणि यूएई यांच्यात सामना खेळवला जात आहे. श्रीलंकेला आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आजचा सामना त्यांच्यासाठी 'करा किंवा मरा' असा असणार आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून यूएईला विजयासाठी 153 धावांचे आव्हान दिले. मात्र यूएईच्या युवा गोलंदाजाने घेतलेल्या हॅटट्रिकमुळे हा सामना फारच चर्चेत आला आहे.
यूएईसमोर 153 धावांचे लक्ष्य
तत्पुर्वी, यूएईने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. श्रीलंकेकडून सलामीवीर पथुम निशंका यांने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. तर कुसल मेंडिसने 33 धावांची खेळी करून श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांशिवाय कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. अखेर श्रीलंकेने 20 षटकांत 8 बाद 152 धावा केल्या. यूएईकडून मयप्पनने हॅटट्रिक घेतली, तर अयान खान आणि आर्यन लाक्रा यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. त्यामुळे यूएईला सामना जिंकण्यासाठी 20 षटकांत 153 धावांची आवश्यकता आहे.
युवा गोलंदाजाने घेतली विश्वचषकातील पहिली हॅटट्रिक
दरम्यान, यूएईचा युवा गोलंदाज कार्तिक मयप्पन याने 2022 च्या विश्वचषकातील पहिली हॅटट्रिक घेतली आहे. मयप्पने 15 व्या षटकात श्रीलंकेच्या 3 फलंदाजांना बाद करून ही किमया साधली. मयप्पनने 15व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भानुका राजपक्षेला बाद करून या मोहिमेची सुरूवात केली. त्याने पुढच्याच चेंडूवर चरिथ असलंकाला झेलबाद केले. त्यानंतर मयप्पनने श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाला तंबूत पाठवून चालू विश्वचषकात पहिली हॅटट्रिक घेतली. या सामन्यांत मयप्पनने चार षटकांत 19 धावा देऊन 3 बळी पटकावले.
यूएईचा मय्यपन ठरला पाचवा गोलंदाज
लक्षणीय बाब म्हणजे ब्रेट ली (2007), कर्टिस कॅम्फर (2021), वानिंदू हसरंगा (2021) आणि कगिसो रबाडा (2021) यांच्यानंतर टी-20 विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा मयप्पन हा पाचवा गोलंदाज ठरला आहे.
टी-२० विश्वचषकात सुपर-१२ फेरी गाठण्यासाठी आठ संघांमध्ये सामने खेळवले जात आहे. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-१२ सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील.
पहिला राउंड
अ गट - नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.
ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे.
सुपर-१२ फेरी
गट 1- अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.
गट 2 - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: UAE’s bowler Karthik Meiyappan takes first hat-trick of 2022 T20 World Cup Against sri lanka watch the video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.