नवी दिल्ली : पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल याच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) तीन वर्षांची बंदी घातली. या निर्णयानंतर उमरचा मोठा भाऊ कामरान अकमल याने म्हटले की, ‘सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली अशा दिग्गजांच्या मैदान आणि मैदानाबाहेरील वर्तणुकीतून उमरने शिकवण घ्यावी.’सट्टेबाजांनी केलेल्या संपर्काची माहिती न दिल्याने उमरला बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. एका कार्यक्रमामध्ये कामरानने म्हटले की, ‘उमरला माझा सल्ला आहे की, त्याने यातून धडा घ्यावा. जर त्याने चूक केली असेल, तर त्याने दुसऱ्यांना शिकवावे. तो अजून युवा आहे आणि आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात.’कोहलीचे उदाहरण देताना कामरान म्हणाला की, ‘उमरने कोहलीकडे शिकावे. आयपीएलच्या सुरुवातीला कोहली वेगळ्या प्रकारचा व्यक्ती होता. त्यानंतर त्याने आपल्या स्वभावामध्ये बदल केले. आज तो कशाप्रकारे अव्वल फलंदाज ठरला आहे हे बघा.’नेहमी वादविवादांपासून दूर राहिलेल्या सचिन तेंडुलकरकडूनही शिकले पाहिजे, असेही कामरानने म्हटले. तो म्हणाला की, ‘पाकिस्तानचा बाबर आझम जगातील अव्वल तीन फलंदाजांमध्ये आहे, तो कधी वादामध्ये पडला नाही. एक महेंद्रसिंग धोनी आहे, त्याने कशाप्रकारे नेतृत्व केले यातूनही आपल्याला शिकण्यास मिळेल. तसेच सचिन पाजी कायमच वादविवादापासून दूर राहिले.आपल्यापुढे ही शानदार उदाहरणे आहेत. या सर्वांच्या वागणुकीवर लक्ष देऊन आपल्याला शिकावेलागेल. ही मंडळी केवळ खेळावर लक्ष देतात. मैदानाबाहेर प्रेक्षकांसह या खेळाडूंची वर्तणूकही खूप चांगली राहिली आहे. हे सगळे खेळाचे शानदार दूत आहेत.’ (वृत्तसंस्था)>उजाळा आठवणींना...कामरानने यावेळी २०१० आशिया चषक आणि २०१२-१३ सालच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी भारताचा गौतम गंभीर आणि ईशांत शर्मा यांच्याशी मैदानावरच अकमलची बाचाबाची झाली होती. अकमल म्हणाला की, ‘हे सर्व गैरसमज आणि त्यावेळी सामन्यातील परिस्थितीमुळे झाले होते. गौतम आणि मी खूप चांगले मित्र असून आम्ही एकत्रितपणे खूप क्रिकेट खेळलोय. आम्ही अनेकदा भेटतो आणि एकत्रित जेवतोही. त्यावेळी गौतम काय म्हणाला ते मला कळले नव्हते आणि त्यामुळे वाद झाला. ईशांतसोबतही माझी चांगली मैत्री आहे. त्याच्यासोबतही असेच झाले होते. दोघेही चांगले खेळाडू असून आम्ही एकमेकांचा सन्मान करतो. मैदानावर जे काही झाले, ते मैदानापुरतेच राहिले.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- "उमरने सचिन, धोनी, कोहलीकडून शिकवण घ्यावी"
"उमरने सचिन, धोनी, कोहलीकडून शिकवण घ्यावी"
‘सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली अशा दिग्गजांच्या मैदान आणि मैदानाबाहेरील वर्तणुकीतून उमरने शिकवण घ्यावी.’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 3:47 AM