Join us  

उमेश, अश्विन यांची चमक; ग्रीनची शतकी खेळी, ऑस्ट्रेलिया ‘अ’ची स्थिती भक्कम

Cricket News : ऑस्ट्रेलिया अ संघाने दुसऱ्या दिवशी कॅमरून ग्रीनच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर ८ बाद २८६ धावा उभारल्या. यजमान संघाकडे आता ३९ धावांची आघाडी झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 4:47 AM

Open in App

सिडनी : अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांनी ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध सराव सामन्यात दमदार कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध  आगामी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज असल्याचा इशारा दिला आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाने दुसऱ्या दिवशी कॅमरून ग्रीनच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर ८ बाद २८६ धावा उभारल्या. यजमान संघाकडे आता ३९ धावांची आघाडी झाली. भारत अ संघाने ९ बाद २४७ अशी मजल गाठून पहिला  डाव घोषित केला होता. कर्णधार अजिंक्य रहाणे ११७ धावा काढून नाबाद राहिला. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या दोन वेगवान गोलंदाजांचे कसोटी खेळणे निश्चित आहे. तिसऱ्या गोलंदाजाच्या शर्यतीत उमेश आहे, त्याने १८ षटकात ४४ धावा देत तीन गडी बाद केले. मोहम्मद सिराज याने १९ षटकात ७१ धावांच्या मोबदल्यात दोन बळी घेतले. उमेशने सलामीवीर विल पुकोवस्की आणि ज्यो बर्न्स यांना माघारी पाठवले. अश्विनने १९ षटके मारा केला. त्याने ५८ धावा देत दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलिया अ कडून अष्टपैलू ग्रीनने शेफील्ड शिल्डमधील फॉर्म कायम राखून १७३ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ११४ धावा केल्या. राष्ट्रीय संघाचा कर्णधार टीम पेन (४४) याच्यासोबत ग्रीनने सहाव्या गड्यासाठी १०४ धावांची भागीदारी केली. त्याआधी यजमान संघाने ९८ धावात अर्धा संघ गमावला होता. ग्रीनने आठव्या गड्यासाठी मायकेल नासिर(३३)सोबत ४९ धावा केल्या.उमेशने पुकोवस्कीला ऑफस्टम्पबाहेर जाणाऱ्या चेंडूवर शुभमान गिलकडे झेल देण्यास बाध्य केले. बर्न्स यष्टीमागे रिद्धिमान साहाकरवी झेलबाद झाला. कर्णधार ट्रॅव्हिस हेड १८ आणि मार्कस्‌ हॅरिस ३५ यांनी ५५ धावांची भर घातली. अश्विनने हॅरिसला स्लिपमध्ये झेलबाद केले. निक मेडिनसन हादेखील अश्विनच्या चेंडूवर पायचीत झाला. ग्रीन आणि टिम पेन यांनी चहापानापर्यंत ५ बाद १८६ अशी वाटचाल करून दिली.खेळ सुरू होताच उमेशचा चेंडू पेनच्या हेल्मेटवर आदळला. यानंतर उमेशला एक धाव घेत पेन माघारी फिरला. 

संक्षिप्त धावफलकभारत अ : पहिला डाव ९३ षटकात ९ बाद २४७ वर घोषित (चेतेश्वर पुजारा ५४, अजिंक्य रहाणे नाबाद ११७, उमेश यादव २४). गोलंदाजी: पॅटिन्सन ५८/३, नासिर ५५/२, हेड२४/२.ऑस्ट्रेलिया अ पहिला डाव : ८५ षटकात ८ बाद २८६ (मार्कस हॅरिस ३५, ग्रीन नाबाद ११४, टिम पेन ४४, गोलंदाजी : उमेश यादव ४४/३, सिराज ७१/२, अश्विन ५८/२.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया