Join us  

कॅप्टन विराटकडून उमेश, शमीची प्रशंसा 

श्रीलंकेवर ३-० अशा दणदणीत कसोटी मालिका विजय मिळवत भारतीय संघाने देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विजयी भेट दिली आहे.  भारतीय संघाच्या या यशात फलंदाज आणि फिरकी गोलंदाजांसोबतच मोहम्मद शमी आणि उमेश यादव या मध्यमगती गोलंदाजांच्या जोडीनेही मोलाचा वाटा उचलला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 6:34 PM

Open in App

 पल्लेकल, दि. १४ - श्रीलंकेवर ३-० अशा दणदणीत कसोटी मालिका विजय मिळवत भारतीय संघाने देशवासियांना   स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विजयी भेट दिली आहे.  भारतीय संघाच्या या यशात फलंदाज आणि फिरकी गोलंदाजांसोबतच मोहम्मद शमी आणि उमेश यादव या मध्यमगती गोलंदाजांच्या जोडीनेही मोलाचा वाटा उचलला आहे. दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवात साधताना कर्णधार विराट कोहलीने उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. उमेश यादव आणि मोहम्मद शमीने संपूर्ण मालिकेत डावाच्या सुरुवातीलाच यजमान संघाला धक्के देण्याची कामगिरी चोख बजावली. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला कधीही चांगली सुरुवात मिळू शकली नाही. दरम्यान, आज सामना संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विराट कोहलीने उमेश यादव आणि मोहम्मद शमीच्या कामगिरीचा आवर्जुन उल्लेख केला. " "गेल्या हंगामात घरच्या मैदानावर खेळताना शमी आणि उमेशने चांगली कामगिरी होती. नवा आणि जुना चेंडू हाताळताना त्यांनी छाप पाडली आहे. त्यामुळे त्यांना या मालिकेमध्येही संधी देण्यात आली. या दोघांनाही झोकून देऊन गोलंदाजी करताना पाहणे हा जबरदस्त अनुभव असतो." असे विराट म्हणाला.  

दरम्यान,  पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे तिस-या कसोटीतही भारताने दणदणीत विजय मिळवला. या मालिकेत श्रीलंकेचे पुरते वस्त्रहरण झाले असून, भारताने तिसरी कसोटी  एक डाव डाव 171 धावांनी जिंकली.  भारताने कसोटी मालिकेत 3-0 असा विजय मिळवला.  या कसोटी विजयासह भारताने एक नवीन इतिहास रचला आहे. भारताने विदेशात प्रथमच सलग ३ कसोटी सामने जिंकले आहेत. आपल्या ८५ वर्षांच्या कसोटी इतिहासात भारताने प्रथमच परदेशात अशा प्रकारची कामगिरी केली आहे.  आज भारताच्या भेदक मा-यापुढे श्रीलंकेचा दुसरा डाव आटोपला. फॉलोऑनच्या दबावाखाली खेळणा-या श्रीलंकन संघातील एकही फलंदाज तिस-या दिवशी मोठी खेळी साकारु शकला नाही. श्रीलंकेचा संपूर्ण संघ १८१ धावांत गारद झाला.