India vs England Test Series: इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. मात्र, भारतीय संघाबाहेर असलेल्या एका खेळाडूने सोशल मीडियावर अशी पोस्ट केली आहे जी चांगलीच व्हायरल होत आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय संघातून सातत्याने वगळल्यानंतर टीम इंडियाच्या शिलेदाराने उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे.
बीसीसीआयने अखेरच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पण, अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवला पुन्हा एकदा भारतीय संघातून वगळण्यात आले. उमेश मागील मोठ्या कालावधीपासून भारतीय संघाबाहेर आहे. अलीकडेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. असे असताना देखील संघात स्थान न मिळाल्याने त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी बोलून दाखवली. उमेश यादवे इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेवत म्हटले, "पुस्तकांवर धूळ बसल्याने कहाणी संपत नाही." खरं तर उमेश यादवला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील संधी मिळाली नव्हती. त्याने भारतासाठी ५७ कसोटी सामने खेळले असून १७० बळी घेतले आहेत.
इंग्लंडविरूद्धच्या उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात आकाश दीपला संधी मिळाली आहे. २७ वर्षीय आकाश दीपने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. आकाश दीपने २९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १०३ बळी घेतले आहेत. या युवा गोलंदाजाने ४ वेळा एका डावात ५ बळी घेण्याची किमया साधली. याशिवाय एका सामन्यात १० बळी देखील आकाश दीपने घेतले आहेत. अलीकडेच आकाश दीप इंग्लंड लायन्सविरुद्ध दिसला होता. आकाश दीपने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या ३ सामन्यांत १३ बळी घेतले. आकाश दीपला २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने २० लाख रूपयांत खरेदी केले होते. त्याने सात सामन्यांत सहा बळी घेतले.
उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, लोकेश राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.