नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेपूर्वी मोहम्मद शमीच्या रूपात भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. कारण भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आगामी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-२० मालिकेला मुकणार आहे. शमी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तो आगामी मालिकेतून बाहेर झाला आहे. तर भारत अ संघामध्ये वेगवान गोलंदाजाची धुरा सांभाळणारा नवदीप सैनी देखील दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. नॉर्थ झोन आणि साउथ झोन यांच्यातील दुलीप करंडक उपांत्य फेरीच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी नवदीप सैनीच्या उजव्या मांडीला दुखापत झाली होती.
दरम्यान, दुखापतीमुळे सैनी सध्या सुरू असलेल्या स्पर्धेतून तसेच भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला आहे. सैनी आता त्याच्या दुखापतीच्या पुढील उपचारासाठी एनसीएकडे जाणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे नवदीप सैनीच्या जागी ऋषी धवनला संघात स्थान मिळाले आहे.
शमीच्या जागेवर 'या' गोलंदाजाची निवड मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे आगामी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेला मुकणार आहे. अशातच त्याच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवकडे भारतीय गोलंदाजाची धुरा सोपवण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा अ संघ -संजू सॅमसन (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यू इसवरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, केएस भरत, कुलदीप यादव, शाभाज अहमद, राहुल चहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर , उमरान मलिक, ऋषी धवन, राज अंगद बावा.