Join us  

Umesh Yadavचा कौंटी क्रिकेटमध्ये धमाका! बॅट हाती येताच केली चौकार-षटकारांची बरसात

उमेशने १००पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने दिला गोलंदाजांना चोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 7:39 PM

Open in App

Umesh Yadav English County: टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये असून एकदिवसीय मालिका खेळत आहे. भारताने पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडला १० गडी राखून हरवले. भारताने एकतर्फी विजय मिळवला असला तरी असे अनेक खेळाडू आहेत, जे सध्या भारतीय वन डे संघात नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे उमेश यादव. उमेश हा सध्या काउंटी क्रिकेट खेळत आहे. मिडलसेक्स क्रिकेट क्लबसोबत तो पहिल्यांदाच करारबद्ध झाला आहे. उमेश यादवने आतापर्यंत आपल्या गोलंदाजीने छाप पाडली होती. पण आता त्याने आपल्या फलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. नुकत्याच झालेल्या वूस्टरशायर विरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या फलंदाजीची कमाल दाखवून दिली.

सामन्याच्या दुसऱ्या डावात उमेश यादवने १०व्या क्रमांकावर येऊन ४४ धावा कुटल्या. त्याने आपल्या डावात ४१ चेंडू खेळले. या खेळीत त्याने ५ अप्रतिम चौकार लगावले तर २ उत्तुंग असे षटकारही चोपले. महत्त्वाची बाब म्हणजे देशाबाहेर, इंग्लंडसारख्या वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या पिचवर उमेश यादवने १००पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. उमेश यादवच्या फटकेबाजीमुळे मिडलसेक्स संघाला फायदा झाला आणि त्यांची धावसंख्या २४० पर्यंत पोहोचली.

फलंदाजीपूर्वी गोलंदाजीतही उमेश यादवला चांगली सुरूवात मिळाली. त्याने मिडलसेक्सला विकेट्सचे खाते उघडून दिले. नंतर मात्र त्याला फारशी छाप पाडणं जमलं नाही.

उमेश यादवने या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिके विरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. इंग्लंड विरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीच्या संघातही त्याचा समावेश करण्यात आला होता, पण त्याला प्लेइंग-11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. उमेश यादवच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर, त्याने भारतासाठी आतापर्यंत ५२ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १५८ विकेट्स घेतल्या आहेत. तर ७५ वन डेमध्ये १०६ विकेट्स आणि ७ टी२० सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत.

टॅग्स :कौंटी चॅम्पियनशिपभारतीय क्रिकेट संघइंग्लंड
Open in App