हैदराबाद, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : निकाल देण्याचे काम पारदर्शकपणे व्हायला हवे. कारण एखाद्या निकालामुळे आयुष्यही बदलू शकते. त्यामुळे कोणताही निकाल देताना तो काळजीपूर्वक द्यायला हवा. पण निकाल देणारा हा देखील माणूस असतो आणि त्याच्याकडूनही चुका होतात. पण एखादी चुक झाल्यावर त्याबद्दल क्षमा मागणारे फारच कमी व्यक्ती असतात. अशीच एक गोष्ट घडली ती क्रिकेटच्या मैदानात.
ही गोष्ट आहे दुसऱ्या कसोटी सामन्यातील. विजयासाठी आव्हानाचा पाठलाग करायला भारतीय सलामीवीर उतरले. पृथ्वीला तिसऱ्या षटकात फलंदाजी करत असताना उजव्या हाताला चेंडू लागला. त्यानंतर वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने त्याच्यावर बाऊन्सरचा मारा सुरु केला.
पाचव्या षटकाच्या पहिलाच चेंडू होल्डरने बाऊन्सर टाकला. यावेळी पृथ्वी हा चेंडू सोडण्यासाठी खाली वाकला. पण चेंडूची उंचीही जास्त नव्हती. हा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. यावेळी होल्डरने पंचांकडे अपील केले. त्यावेळी पंचांनी त्याला नाबाद ठरवले. पण होल्डरने त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली तेव्हा पृथ्वी बाद होत असल्याचे दिसत होते.
मैदानावरील पंच इयान गोऊल्ड यांनी जर पृथ्वीला बाद दिले असते, तर तो योग्य निर्णय ठरला असता. कारण चेंडू यष्टीला अर्धा लागत असल्याचे दिसत होते. त्यावेळी पंचांनी पृथ्वीला बाद केले असते आणि त्याने जर तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली असती तर तो बाद ठरला असता. हे सारे पाहिल्यावर पंच इयान यांना आपला निर्णय चुकल्याचे समजले. त्यावेळीच त्यांनी गोलंदाज जेसन होल्डरची माफी मागितली.