Big Blow to Pakistan, Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानात खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नाही, असे भारतीय संघाने सांगितल्यामुळे टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. या धक्क्यातून पाकिस्तान सावरत असताना त्यांना आणखी एक सणसणीत चपराक बसली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पंच नितीन मेनन (Umpire Nitin Menon ) यांनी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. आधी भारतीय संघ, त्यानंतर सामनाधिकारी जवागल श्रीनाथ ( Javagal Srinath ) आणि मग पंच नितीन मेनन असे तीन नकार पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानले जात आहेत. टीओआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पंच म्हणून काम पाहणाऱ्यांची यादी आजच जाहीर केली आहे. या यादीत नितीन मेनन यांचे नाव नाही. त्यांनी पाकिस्तानात जाण्यासाठी नकार दिल्याने त्यांचे या यादीत नाव नाही असे कारण सांगितले जात आहे. नितीन मेनन यांचा पंच म्हणून ४० कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. त्यातील ३० सामन्यात ते मैदानावरील पंच होते तर १० सामन्यात त्यांनी टीव्ही अंपायर म्हणून काम पाहिले. त्याशिवाय त्यांनी ७५ एकदिवसीय सामन्यांमध्येही काम पाहिले आहे. तसेच ७५ टी२० सामन्यांमध्येही त्यांनी पंच म्हणून काम पाहिले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पंचाची यादी
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलब्रू, एहसान रझा, पॉल रायफल, शराफुद्दौला इब्ने शाहिद, रॉडनी टकर, अॅलेक्स व्हार्फ, जोएल विल्सन या पंचांचा समावेश करण्यात आला आहे.
'मॅच रेफरी' जवागल श्रीनाथही बाहेर
माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि अनुभवी आयसीसी मॅच रेफरी जवागल श्रीनाथने देखील चॅम्पियन्स ट्रॉफीमधून नाव काढून घेतले आहे. त्यामुळे त्यालाही सामनाधिकारींच्या पॅनेलमध्ये संधी मिळालेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान डेव्हिड बून, अँड्र्यू पॉयक्रॉफ्ट आणि रंजन मदुगले हे सामनाधिकारी असणार आहेत. जवागल श्रीनाथ याचा सामनाधिकारी म्हणून दीर्घ अनुभव आहे. त्याने ७९ कसोटी आणि २७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये सामनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय, त्याने १३६ टी२० सामन्यांमध्येही मॅच रेफरीचे काम केले आहे.