नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान यांच्यादरम्यान रविवारी खेळल्या वन-डे मालिकेतील दुसरी लढत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या लढतीत पाकिस्तानचा फलंदाज फखर जमान १९३ धावांवर फलंदाजी करीत असताना धावबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकने ज्या पद्धतीने फखरला धावबाद केले त्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
रविवारी खेळल्या गेलेल्या या लढतीत कर्णधार टेंबा बवुमा (९२) व क्विंटन डिकॉक (८०) यांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ३४१ धावांची मजल मारली. त्यानंतर पाकिस्तानला सलामीवीर फखर जमानच्या १९३ धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर ३२४ धावा करता आल्या. पाकला या लढतीत १७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
चूक माझीच : झमान
पाकिस्तानचा फलंदाज फखर झमान १९३ धावांवर धावबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकने फखरला चुकीच्या पद्धतीने बाद केल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत फखरने स्वत:ला दोषी ठरवले आहे. तो म्हणाला, ‘चूक माझीच होती. मी दुसऱ्या बाजूला धावणाऱ्या हारिस रौफकडे बघत होतो. मला वाटले की, त्याने धाव घेताना उशीर केला. उर्वरित मॅच रेफरीवर अवलंबून आहे. पण मला क्विंटनची यात चूक असल्याचे वाटत नाही.’ दरम्यान, द्विशतक हुकल्याचे तुलनेत सामना हरल्याचे शल्य अधिक असल्याचे फकरने सांगितले.
फखरच्या धावबाद होण्यावर प्रश्न
पाकिस्तानच्या सलामीवीर फखरने १५५ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकार व १० षटकांराच्या सहायाने १९३ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर दुसरी धाव घेण्यासाठी फखर धावत असताना तो धावबाद झाला. क्विंटन डिकॉकने नॉन स्ट्राइककडे इशारा केला आणि फखरने वळून बघितले. त्यानंतर एडम मार्करामचा थेट थ्रो यष्टीला लागला व तो धावबाद झाला. डिकॉकचा अशाप्रकारे इशारा करणे काही लोकांना मुद्दाम केलेली कृती वाटली.
त्यानंतर क्रिकेटचे नियम तयार करणारी संस्था मेरीलबोन क्रिकेट क्लबने ट्विट करीत याबाबत चर्चा केली. ट्विटमध्ये नियमाचा हवाला देताना सांगितले जर खेळाडूने दुसऱ्या खेळाडूला भ्रमित करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा तो खेळाडू स्वत: भ्रमित झाला असेल तर नियमामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, याबाबतचा निर्णय अम्पायरला घ्यायचा आहे. जर अम्पायरला फिल्डर दोषी वाटत असेल तर फलंदाजाला नाबाद ठरवायला हवे आणि संघाच्या खात्यात ५ पेनल्टी धावांची भर घालावी.
Web Title: The umpire should decide whose fault it is
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.