मेलबर्न : टी-२० विश्वचषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ४ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्याच्या अखेरच्या षटकांत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शेवटच्या तीन चेंडूत भारताला विजयासाठी १३ धावांची गरज होती. मोहम्मद नवाजच्या नो बॉलवर विराट कोहलीने षटकार ठोकला. फ्री हिटवर विराट बोल्ड झाला पण चेंडू थर्ड मॅनकडे गेला. भारतीय फलंदाजांनी तीन धावा काढल्या. तेव्हापासून पाकिस्तानी चाहते अम्पायरवर चांगलेच संतापले असून सतत प्रश्न उपस्थित करत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चेंडू स्टम्पला लागताच डेड बॉल घोषित करायला हवा होता.
सायमन टॉफेल यांनी शिकवला धडा
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज अम्पायर सायमन टॉफेल यांची गणना क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम अम्पायर यांच्यामध्ये केली जाते. आता त्यांनी देखील भारत-पाकिस्तान सामन्यातील वादाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. टॉफेल यांनी लिंक्डइनवर लिहले, "एमसीजी येथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या रोमहर्षक समाप्तीनंतर, कोहली फ्री हिटवर बाद झाल्यानंतर अनेक लोकांनी मला भारताने केलेल्या धावांचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे."
"चेंडू स्टम्पला लागल्यानंतर थर्ड मॅनकडे गेला आणि कोहली-कार्तिक यांनी ३ धावा काढल्या. त्यावेळी अंपायरने बायचा इशारा देण्याचा योग्य निर्णय घेतला. खेळाडू फ्री हिटवर स्टम्पवर चेंडू लागल्याने बाद होऊ शकत नाही आणि त्यामुळे विकेटवर आदळल्यानंतरही चेंडू डेड होणार नाही." अशा शब्दांत टॉफेल यांनी या वादावर स्पष्टीकरण दिले.
सलग ५ वर्षे राहिले सर्वोत्तम अम्पायर
ऑस्ट्रेलियाचे ५१ वर्षीय सायमन टॉफेल सलग पाच वर्षे जगातील सर्वोत्तम अम्पायर म्हणून राहिले आहेत. २००४ ते २००८ या काळात त्यांनी सातत्याने हा पुरस्कार पटकावला आहे. लक्षणीय बाब म्हणजे हा पुरस्कार सर्वाधिक वेळा जिंकणारे ते पहिले अम्पायर ठरले आहेत. १९९९ मध्ये त्यांनी वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अम्पायरिंग केली होती. २०१२ मध्ये त्यांनी शेवटच्या वेळी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अम्पायरिंग केली होती. त्यानंतर त्यांनी अनेकवेळा आयसीसीमध्ये अम्पायरांना प्रशिक्षण दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Umpire Simon Taufel has taught Pakistani fans a lesson in rules by commenting on the 'dead ball' controversy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.