Join us  

IND vs SL: उमरान मलिकच्या वेगासमोर श्रीलंकेचा कर्णधार 'ढेर', जसप्रीत बुमराहचा विक्रम काढला मोडीत

IND vs SL, 1st T20: भारतीय संघ मायदेशाच श्रीलंकेविरूद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 10:38 AM

Open in App

मुंबई : भारतीय संघ मायदेशात श्रीलंकेविरूद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून यजमान संघाने नववर्षातील आपली सुरूवात विजयाने केली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात हार्दिक सेनेने 2 धावांनी विजय मिळवला. भारताचा युवा गोलंदाज शिवम मावीने आपल्या पदार्पणाचा सामना अविस्मरणीय करत 4 षटकांत 22 धावा देऊन 4 बळी घेतले. 

तत्पुर्वी, पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताचे सलामीवीर ईशान किशन आणि शुबमन गिल यांनी साजेशी सुरूवात केली. किशनने ताबडतोब खेळी करून पाहुण्या संघावर दबाव टाकला. मात्र, पदार्पणाचा सामना खेळत असलेला गिल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादव (7), संजू सॅमसन (5), हार्दिक पांड्या (29), ईशान किशन (37) धावा करून बाद झाले. पण दिपक हुडा (नाबाद 41) आणि अक्षर पटेल (नाबाद 31) यांनी शानदार खेळी करून श्रीलंकेसमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले. 

भारताचा 2 धावांनी विजय  प्रत्युत्तरात, श्रीलंकेची सुरूवात निराशाजनक झाली, मात्र सांघिक खेळीच्या जोरावर पाहुण्या संघाने सामन्यात रंगत आणली. भारताकडून शिवम मावीने शानदार गोलंदाजी केली. याशिवाय उमरान मलिकने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. उमरान मलिकने त्याच्या 4 षटकांत 27 धावा देऊन 2 बळी पटकावले.  चार षटकात 27 धावा दिल्या. त्याने त्याच्या स्पेल दरम्यान 155 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला, जो सामन्यातील सर्वात वेगवान चेंडू देखील होता.

जसप्रीत बुमराहचा विक्रम काढला मोडीत  उमरान मलिकने पहिल्या सामन्यात वेगवान चेंडू टाकून जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडीत काढला. भारतीय गोलंदाज बुमराहचा आतापर्यंतचा सर्वाधिक वेग 153.36 किमी प्रतितास इतका आहे. मंगळवारी श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात जम्मू एक्सप्रेस उमरानने हा विक्रम मोडला. बुमराहच्या खालोखाल या यादीत मोहम्मद शमी (153.3 किमी), नवदीप सैनी (152.85 किमी) यांचा समावेश आहे. लक्षणीय बाब म्हणजे उमरान मलिकने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला बाद करून सामना भारताच्या बाजूने फिरवला. कालच्या सामन्यात भारताकडून शिवम मावीने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी 2-2 बळी घेण्यात यश आले.  

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा ट्वेंटी-20 संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

भारत विरूद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक 

  • 3 जानेवारी, मंगळवार - पहिला ट्वेंटी-20 सामना, मुंबई
  • 5 जानेवारी, गुरूवार - दुसरा ट्वेंटी-20 सामना, पुणे 
  • 7 जानेवारी, शनिवार - तिसरा ट्वेंटी-20 सामना, राजकोट 
  • 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
  • 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
  • 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाजसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघहार्दिक पांड्यामुंबई
Open in App