Umran Malik IND vs SA T20 Series: IPL 2022 मध्ये आपला ठसा उमटवणारा 'जम्मू एक्सप्रेस' उमरान मलिक ९ जूनपासून होणाऱ्या भारत-आफ्रिका टी२० मालिकेत पहिल्यांदा टीम इंडियाची जर्सी परिधान करणार आहे. यंदाच्या IPL मध्ये १४ सामन्यात उमरान मलिकने तब्बल २२ बळी टिपले. संपूर्ण हंगामातील दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान चेंडू त्याने टाकला. तसेच, प्रत्येक सामन्यात त्याने सातत्याने सरासरी ताशी १५० किमीच्या वेगाने गोलंदाजी केली. त्यामुळे आता तो टीम इंडियाकडून आपला प्रभाव दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. याचदरम्यान, पाकिस्तानचा गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी याने, 'गोलंदाजीत उमरान मलिकसारखा नुसता वेग असून काही उपयोग नाही', असं विधान केलं होतं. त्यानंतर आता उमरानने पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आणि चाहत्यांना चांगलंच झोंबेल असं विधान केले.
उमरान मलिकची गोलंदाजीची शैली थोडीशी पाकिस्तानचा वकार युनिस याच्यासारखी आहे, असे ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली म्हणाला होता. याचसंदर्भात उमरानला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने सडेतोड उत्तर दिले. "मी कधीही वकार युनिसच्या गोलंदाजीकडे बघून त्याला फॉलो करायचा प्रयत्न केलेला नाही. माझी ही नैसर्गिक गोलंदाजी शैली आहे. माझे आदर्श जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे आहेत. मी जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा माझं लक्ष या तिघांकडे असतं. त्यांच्याकडे पाहूनच मी शिकतो आणि पुढेही शिकत राहीन.
"टीम इंडियात माझी निवड झाली म्हणून मी अजिबात हुरळून गेलेलो नाही. कारण मला माहिती आहे जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा आपल्या संधी नक्कीच मिळेल. मला माझ्या देशासाठी सर्वोत्तम खेळ करायचा आहे. आता मला पाच टी२० सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेसारख्या तुल्यबळ संघासमोर संधी मिळाली आहे. यात खेळायला मिळाले तर माझं लक्ष्य पाचही सामने जिंकणे, हेच असेल. संघाला एकहाती सामने जिंकवून देणं आणि सर्वोत्तम कामगिरी करणं हे माझ्यापुढली सध्याचे ध्येय आहे", असेही उमरान स्पष्ट शब्दात म्हणाला.
IPL बद्दल बोलताना....
"यंदाच्या हंगामात मला चाहत्यांना प्रचंड प्रेम आणि आदर-सन्मान दिला. त्यासाठी मी सर्वांचाच आभारी आहे. मला टीम इंडिया आणि IPL मध्ये संधी मिळाल्याने माझे नातेवाईक आणि मित्रमंडळी माझं घरी येऊन अभिनंदन करून गेले, ते माझ्यासाठी खूपच स्पेशल होतं. IPL संपल्यानंतर मी थोडासा वैयक्तिक कामात व्यस्त होतो पण तरीही मी माझी ट्रेनिंग सेशन्स आणि सराव करत होतो", असं तो IPL आणि त्यानंतरच्या कालावधीबाबत म्हणाला.