नवी दिल्ली - अंडर-19 आशिया कप 2021च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. 50 ऐवजी केवळ 38 षटकांच्या झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेला 9 फलंदाज तंबूत पाठवत केवळ 106 धावांवरच रोखले. प्रत्युत्तरात भारताने फक्त 21.3 षटकांत एका फलंदाजाच्या मोबदल्यात श्रीलंकेने दिलेले लक्ष्य गाठले आणि इतिहास रचत 8व्यांदा अंडर-19 आशिया कपावर आपले नाव कोरले.
भारत बनला आशिया किंग -
श्रीलंकेच्या 107 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने केवळ 1 गडी गमवत लक्ष्य पूर्ण केले. भारताकडून सलामीवीर अंगक्रिस रघुवंशीने नाबाद 56 तर शेख रशीदने नाबाद 31 धावा केल्या. याशिवाय भारताला हरनूर सिंगच्या (5) रूपात एकमेव झटका बसला. यापूर्वी उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा पराभव केला होता. तर श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला होता.
गोंलंदाजांची कमाल -
पावसामुळे प्रभावित झालेल्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने शुक्रवारी श्रीलंकेचा डाव 9 बाद 106 धावांवर रोखला. सकाळीच झालेल्या पावसानंतर परिस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल होती. पण श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राजवर्धन हंगरगेकर आणि रवी कुमार या भारतीय वेगवान गोलंदाज जोडीने नव्या चेंडूवर चांगली सुरुवात केली. मात्र, हंगरगेकरला नशिबाची साथ मिळाली नाही. पण डावखुरा वेगवान गोलंदाज रवीने चौथ्या षटकात चामिंडू विक्रमसिंघेला बाद करत सामन्यातील पहिला बळी मिळवला. डावखुरा सलामीवीर विक्रमसिंघेने मिड-विकेटवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू थेट थर्ड मॅनवर उभ्या असलेल्या राज बावाच्या हातात जाऊन बसला.
विक्रमी 8 आशिया चषक विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ या संपूर्ण फायनलमध्ये श्रीलंकेच्या तुलनेत सरस दिसत होता. हंगरगेकर हा पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वात प्रभावी वेगवान गोलंदाज ठरला. त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला.
Web Title: Under 19 asia cup 2021 team india beat sri lanka in the finals by 9 wickets India are the winners of U19 AsiaCup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.