क्विन्सटाऊन : अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत तीनदा जेतेपदाचा मान मिळवणा-या आॅस्ट्रेलिया संघापुढे मंगळवारी सुपर लीग उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य इंग्लंडचे आव्हान राहणार आहे.
स्पर्धेच्या सलामी लढतीत आॅस्ट्रेलियाला भारताविरुद्ध १०० धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने सलग दोन सामने जिंकत सूर गवसल्याचे सिद्ध केले. इंग्लंडने साखळी फेरीत तीनही सामने जिंकत फॉर्मात असल्याचे सिद्ध केले. सामन्यापूर्वी सराव सत्रात उभय संघांचे मनोधैर्य उंचावलेले दिसले.
आॅस्ट्रेलियाचा कर्णधार जेसन सांघा म्हणाला, ‘आम्हाला कसे खेळायचे आहे, यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. मंगळवारच्या लढतीत आम्ही चांगली कामगिरी करू. आम्ही काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली असून संघामध्ये सकारात्मक ताळमेळ आहे. ’
सांघा पुढे म्हणाला, ‘आमच्या संघातील सर्वच १५ खेळाडू आपली भूमिका चांगल्या पद्धतीने बजावण्यास सज्ज आहेत. ज्या खेळाडूला संधी मिळेल, तो सर्वस्व झोकून देण्यास सज्ज असेल, असा आम्हाला विश्वास आहे.’
दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार हॅरी बुक यालाही संघाच्या कामगिरीवर विश्वास आहे. बुक म्हणाला, ‘आम्ही अचूक मारा करीत त्यांना खेळण्यास बाध्य केले तर प्रतिस्पर्धी संघाला १००-१५० धावांत गुंडाळू शकतो.’
Web Title: Under-19 World Cup: England's challenge ahead of Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.