माऊंट मोनगानुई : अंडर-१९ विश्वचषकाची आधीच उपांत्यपूर्व फेरी गाठणारा भारतीय संघ विजयी लय कायम राखण्याच्या हेतूने आज शुक्रवारी कमकुवत झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. माजी विजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्धचा विजय आत्मविश्वास वाढविणारा ठरला. भारताने तो सामना १०० धावांनी जिंकला. कमकुवत संघाविरुद्धच्या सामन्यात काही प्रयोग करण्याची संधी भारताकडे असेल. वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीने अनेकांचे लक्ष वेधले. कोच राहुल द्रविड त्याला पुन्हा खेळविणार की विश्रांती देणार हे पाहावे लागेल. विदर्भाचा वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरे यालादेखील संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारताची गोलंदाजी भक्कम असून डावखुरा अनुकूल रॉय वेगवान माºयास साथ देत आहे. कर्णधार पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखालील फलंदाजी फळीला अद्याप भेदक माºयास तोंड देण्याची वेळ आलेली नाही. झिम्बाब्वेकडूनही कडवे आव्हान मिळण्याची शक्यता राहील. झिम्बाब्वेविरुद्ध खेळले गेलेले आतापर्यंतचे सर्व चारही सामने भारतानेच जिंकले आहेत. उभय संघांदरम्यान पहिला सामना २००५ मध्ये आफ्रो आशियाई अंडर-१९ चषकादरम्यान खेळविण्यात आला होता.
भारत : पृथ्वी शॉ (कर्णधार), शुबमन गिल, आर्यन जुयाल, अभिषेक शर्मा, अर्शदीपसिंग, हार्विक देसाई, मनज्योत कालरा, कमलेश नागरकोटी, पंकज यादव, रियान पराग, हिमांशू राणा, अनुकूल रॉय, शिवम मावी व शिवसिंग.झिम्बाब्वे : लियाम रोचे (कर्णधार), रॉबर्ट चिम्हिन्या, जोनाथन कोनोली, अॅलिस्टेयर फ्रॉस्ट, टॅन हॅरिसन, वेस्ले माधेवेर, तनुनुर्वा माकोनी, डोनाल्ड म्लाम्बो, तिनाशे नेनहुन्जी, एनकोसिलातु नूनू, कीरन रोबिन्सन, जेडेन शादेनडोर्फ आणि मिल्टन शुम्बा.सामना : भारतीय वेळेनुसार सकाळी ६.३० पासून.