दुबई : आगामी आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत भारतीय कर्णधार पृथ्वी शॉ, आॅस्ट्रेलियाचा कर्णधार जेसन सांघा आणि अफगाणिस्तानचा आॅफस्पिनर मुजीब जादरान या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांची नजर राहणार आहे. न्यूझीलंडमध्ये १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत खेळल्या जाणा-या अंडर-१९ विश्वकप स्पर्धेच्या निमित्ताने भविष्यात स्टार म्हणून नावलौकिक मिळवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यात भारतीय कर्णधार पृथ्वी शॉचा समावेश आहे. शॉने अलीकडेच रणजी ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.आयसीसीने म्हटले आहे की, ‘आयसीसी अंडर-१९ विश्वकप नेहमी क्रिकेटपटूंना कौशल्य दाखविण्यासाठी मोठे व्यासपीठ आहे. २०१८ मध्येही असेच घडेल, ही आशा आहे.’अफगाणिस्तान संघाचा कर्णधार नवीन उल-हक व आॅफस्पिनर मुजीब जादरान हे दोघेही सीनिअर संघात खेळलेले आहेत. जादरानने आयर्लंडविरुद्ध वन-डेमध्ये पदार्पणाच्या लढतीत २४ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले होते. त्याच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने अंडर-१९ आशिया कप स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. जादरानने नेपाळविरुद्ध उपांत्य लढतीत २८ धावांच्या मोबदल्यात सहा आणि पाकिस्तानविरुद्ध अंतिम लढतीत १३ धावांत ५ बळी घेतले होते.आॅस्ट्रेलिया संघात मूळ भारतीय जेसन सांघा व माजी कर्णधार स्टीव्ह वॉचा मुलगा आॅस्टिन वॉ आहेत. सचिन तेंडुलकरनंतर सर्वांत कमी वयात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सांघा आॅस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करणारा मूळ भारतीय पहिला क्रिकेटपटू आहे. माजी चॅम्पियन इंग्लंडकडे अष्टपैलू विल जॅक्स आहे. तो एकट्याच्या बळावर सामन्याचे चित्र बदलण्यास सक्षम आहे. दक्षिण आफ्रिका दौºयात त्याने चमकदार कामगिरी केली. एका सामन्यात त्याने ४१ धावांत ४ बळी घेण्याव्यतिरिक्त ७१ धावांची खेळी केली होती. आयर्लंड संघात डावखुरा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटिल आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आयर्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यजमान न्यूझीलंड संघात रचिन रवींद्र आहे. तो डावाची सुरुवात करण्याव्यतिरिक्त डावखुरा फिरकी गोलंदाज आहे.दक्षिण आफ्रिकेला २०१४ प्रमाणे जेतेपद पटकवायचे असेल तर आक्रमक फलंदाज मॅथ्यू ब्रीत्जके याला चांगली कामगिरी करावी लागेल. त्याने अंडर-१९ क्रिकेटमध्ये आतापर्यंत तीन शतके झळकावली आहे. लिस्ट एमध्ये त्याची सर्वोच्च खेळी ९४ धावांची आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एनटीनीचा मुलगा थांडो एनटीनीचाही समावेश आहे.शॉ सर्वाेत्तम फलंदाज... आयसीसीतर्फे प्रकाशित पत्रकामध्ये पृथ्वी शॉबाबत म्हटले आहे की, ‘तीन वेळा जेतेपद पटकावणाºया भारतीय संघात कर्णधार पृथ्वी शॉच्या रूपाने सर्वोत्तम फलंदाज आहे. मुंबईमध्ये २०१३ च्या आंतरशालेय सामन्यात ५४६ धावांची खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉ प्रकाशझोतात आला होता. या १८ वर्षीय खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाच शतके ठोकली आहेत.’ पृथ्वीने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ९ प्रथम श्रेणी सामन्यांत ५६.५२ च्या सरासरीने ९६१ धावा केल्या आहेत. त्यात पाच शतके व तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यातील तीन शतके त्याने यंदाच्या रणजी मोसमात लगावली आहेत.