भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली श्रीलंकन संघाला २-० असं पराभूत केलं आणि कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताला २३८ धावांनी विजय मिळाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच कसोटी मालिका असल्याने या दणदणीत विजयाचं साऱ्यांनीच स्वागत केलं. रोहित शर्माच्या कौतुकासोबत काहींनी त्याच्या कॅप्टन्सीची तुलना विराट कोहलीशीही केली. त्यामुळे नवीन वाद निर्माण झाल्याचं दिसून आला.
भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याने एक ट्वीट केलं. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा जो सेटअप होता त्याबाबत त्याने भाष्य केलं. त्या रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या दोघांच्या जोडीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आता जगात अजिंक्य झाल्यासारखं दिसतंय, अशा आशयाचं ट्वीट त्याने केलं. पण काही चाहत्यांना हे ट्वीट रूचलं नाही. त्यामुळे त्यावरून वाद झाल्याचं दिसून आलं.
राहुल, रोहित, विहारी, कोहली, अय्यरस पंत, जाडेजा, अश्विन, बुमराह, शमी आणि ११व्या खेळाडूसाठी हवे तेवढे पर्याय...अचानक सगळं कसं छान आणि योग्य वाटू लागलंय. रोहित आणि द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आता जगातील कोणत्याही संघाला हरवेल असा विश्वास वाटतोय आणि त्या अर्थाने संघ आकार घेऊ लागलाय, असं ट्वीट कैफने केलं. त्यावरून त्याला काही चाहत्यांनी सुनावलं.
--
आताचा संघ हा विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आला आहे. विहारी पासून ते अक्सर पटेलपर्यंत सर्व जण पहिला कसोटी सामना विराटच्या नेतृत्वाखालीच खेळले आहेत. त्यामुळे उगाच एकाद्याचं उगाच कौतुक करत बसू नकोस, असं एका युजरने लिहिलं. तर दुसऱ्याने कैफला IPL मधील एक कटू आठवण सांगितली. विराटला RCBचं कर्णधार केल्यानंतरच कैफला संघातून करारमुक्त करण्यात आलंय, असं एकाने खोचक ट्वीट केलं.