गेल्या आठवड्यात २९ जून रोजी वेस्ट इंडिज मधील ब्रिजटाऊन येथे झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला होता. त्याबरोबरच भारतीय संघाने दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं होतं. टी-२० क्रिकेटमधील भारताचं हे दुसरं विजेतेपद आहे. दरम्यान, भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद मिळवल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाबाबत मोठं भाकित केलं आहे.
बार्बाडोसच्या मैदानात रोहित शर्मा भारताच्या विजयाचा झेंडा रोवेल, असं भाकित बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी-२० विश्वचषकापूर्वी एका कार्यक्रमामध्ये केलं होतं. भारतीय संघानंही टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतील दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत जय शाह यांचं भाकित खरं ठरवलं होतं. त्यानंतर रोहित शर्मा याने ब्रिजटाऊन येथील मैदानावर भारताचा तिरंगा झेंडाही रोवला होता.
त्यानंतर आता जय शाह यांनी पुन्हा एकदा मोठी भविष्यवाणी केली आहे. जय शाह यांनी सांगितलं की, भारतीय संघ रोहिल शर्माच्या नेतृत्वाखाली पुढील वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉपी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत विजय मिळवेल, असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला. जय शाह यांच्या विधानमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माच भारतीय संघाचं नेतृत्व करेल हे स्पष्ट झालं आहे. रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. मात्र तो एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये यापुढेही खेळणार आहे.