India vs England ( Marathi News ) : भारतीय संघाला पहिल्या डावात १९० धावांची आघाडी मिळवूनही इंग्लंडकडून पहिल्या कसोटीत हार पत्करावी लागली. फिरकीला पोषक खेळपट्टीवर भारतीय संघाचा असा पराभव हा दुर्मिळच आहे. हैदराबादमधील ऐतिहासिक विजयासह इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Michael Vaughan ) याने कर्णधार रोहित शर्मावर जोरदार टीका केली. विराट कोहली कर्णधार असता तर भारताने ही पहिली कसोटी गमावली नसती, असा दावा वॉनने केला आहे.
अनुष्काची प्रेग्नन्सी नव्हे, तर विराट कोहली 'या' कारणामुळे क्रिकेटपासून दूर; post viral
विराटने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली. त्याच्या अनुपस्थितीत रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडकडून २८ धावांनी हरला. पदार्पणवीर टॉम हार्टलीने ७ विकेट्स घेत भारताला पराभूत केले. त्याआधी ऑली पोपच्या १९६ धावांनी इंग्लंडला मजबूत आघाडी मिळवून दिली होती.
'क्लब प्रेरी फायर' या यूट्यूब चॅनलवर बोलताना वॉन म्हणाला की रोहित कर्णधार म्हणून "फक्त स्विच ऑफ" झाला आहे, जर विराट त्या परिस्थितीत भारतीय कर्णधार असता तर असे झाले नसते. "कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या कर्णधारपदाची त्यांना मोठ्या प्रमाणात उणीव भासली. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने तो सामना गमावला नसता. रोहित एक महान खेळाडू आहे. पण मला वाटले की तो पूर्णपणे स्विच ऑफ झाला आहे,"असे वॉन म्हणाला.
गेल्या आठवड्यात 'द टेलिग्राफ'साठी त्याच्या स्तंभात अशाच प्रकारची नोंद लिहिताना, वॉनने रोहित साधारण कर्णधार असल्याची टीका केली होती. “मला वाटले की रोहित शर्माचे कर्णधारपद खूप साधारण आहे. मला वाटत नाही की त्याने त्याच्या क्षेत्ररक्षणात डावपेच आखले किंवा त्याच्या गोलंदाजीतील बदलांमध्ये तो सक्रिय होता. त्याच्याकडे ऑली पोपच्या स्वीप किंवा रिव्हर्स स्वीपचे कोणतेही उत्तर नव्हते,” असे वॉनने लिहिले.