T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य

न्यूझीलंड आयसीसी स्पर्धांमध्ये नेहमी उपांत्य फेरी गाठतोच, पण सध्याच्या स्पर्धेत लवकरच गाशा गुंडाळण्याची त्यांच्यावर वेळ आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 11:24 AM2024-06-16T11:24:04+5:302024-06-16T11:25:33+5:30

whatsapp join usJoin us
Unexpected results possible in Super Eight | T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य

T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाज मेमन (कन्सल्टिंग एडिटर)

पाकिस्तान संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला. अमेरिका-आयर्लंड यांच्यातील शुक्रवारचा सामना पावसामुळे रद्द होताच पाकला 'पॅकअप' करावे लागले. तसे पाहता या स्पर्धेत पाक संघ फारच खराब खेळला. खेळाडूंची देहबोली नकारात्मक होती. संघाकडे कुठलीही रणनीती नव्हती. कर्णधार बाबर आझम सहकाऱ्यांना प्रेरणा देण्यात अपयशी ठरला. दुसरीकडे न्यूझीलंडची स्थिती अशीच झाली. हा संघदेखील सुपर आठमध्ये पोहोचू शकला नाही. न्यूझीलंड आयसीसी स्पर्धांमध्ये नेहमी उपांत्य फेरी गाठतोच, पण सध्याच्या स्पर्धेत लवकरच गाशा गुंडाळण्याची त्यांच्यावर वेळ आली.

'नशीब खोटे' म्हणू नका!

पाकिस्तान संघ अमेरिकेकडून पराभूत होईल, असे कुणाच्या ध्यानीमनी नव्हते. अमेरिकेला नशिबाची साथ लाभली, असेही नाही. त्यांनी सुपर ओव्हरमध्ये विजय साजरा केला. पाकला खडे चारणे सहज सोपे नव्हते. पण अमेरिकेने अनपेक्षितचे रूपांतर अपेक्षितमध्ये केले. अफगाणिस्तानही सुपर आठमध्ये दाखल झाला. या दोन्ही संघांनी बाद फेरी गाठून बलाढ्य संघांना इशारा दिला की अन्य संघांना सहज लेखू नका! तुम्ही कुणालाही कमकुवत मानू शकत नाही.

टी-२० मध्ये अधिक संधी !

टी-२० मध्ये बलाढ्य संघदेखील कमकुवत संघाकडून पराभूत होऊ शकतो. उदा. पाकचा अमेरिकेकडून झालेला पराभव. शनिवारी द. आफ्रिका संघ नेपाळकडून बालंबाल बचावला, कमी षटकांच्या सामन्यात दोन्ही संघांच्या बाजूने विजयाचे पारडे दोलायमान होत राहते. कमी षटकांमुळे चुरस वाढत जाते. जसे आयर्लंड, अफगाणिस्तान, स्कॉटलैंड हे संघ विजयाचे पारडे डे फिरवू शकतात. कमी षटकांमुळे शैली आणि कौशल्य यातील तफावत कमी होते. एखादा संघ वनडेत चांगला असेल तर तो टी-२० तही चांगलाच असेल अशी खात्री नसते. वेस्ट इंडीजचेच उदाहरण घ्या. कधीकाळी कसोटी आणि वनडेत ताकदवान ठरलेला हा संघ कसोटी क्रमवारीत सध्या तळाच्या स्थानावर आहे, वनडे विश्वचषकासाठी तो पात्र ठरला नव्हता. त्याचवेळी टी-२० मध्ये तो बलाढ्य वाटतो. सुपर आठमध्ये स्थानिक प्रेक्षकांपुढे विंडीज आणखी धोकादायक ठरेल.

पाक संघ का ढेपाळला..?

- संघाची दोषपूर्ण उभारणी. क्रिकेट विकासाच्या योजनांचा अभाव.

- कर्णधार आणि प्रशिक्षक वारंवार बदलण्याचा मोठा फटका बसला.

- संघातील कलह, खेळाडू तीन गटांत विभागले आहेत. बोर्डातील राजकारण. व्यवस्थेतील आमूलाग्र बदलाशिवाय चांगले दिवस येऊ शकणार नाहीत.

अन्य बोर्डानी धडा घ्यावा

पाकमधील क्रिकेटच्या अधोगतीची दखल घेत अन्य देशांच्या बोर्डानी धडा घ्यावा. सरकारी हस्तक्षेप पाक क्रिकेटचे जहाज बुडवत आहे. क्रिकेट संचालनात वाजवीपेक्षा जास्त हस्तक्षेप केल्यास काय होते, हे ध्यानात घेत अन्य बोर्डानी सावध व्हायला हवे.

'बेभरवशाचा संघ' संबोधू नका

पाकमधील क्रिकेटचे जाणकार स्वतःच्या संघाला आतापर्यंत 'अनप्रेडिक्टेबल' अर्थात बेभरवशाचा संघ संबोधत आले. हा विचार बदलावा लागेल. ताकदवान संघ बनविण्याच्या दीर्घकालीन योजना राबवाव्या लागतील. सध्याचे क्रिकेटमधील चित्र पाहता, पाकला 'अनप्रेडिक्टेबल' संबोधणे केवळ जुमला ठरू शकतो.

Web Title: Unexpected results possible in Super Eight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.