Ravindra Jadeja attends 5-6 rallies : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारताला दोन मोठे धक्के बसले. जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा या स्टार खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्याचा प्रत्यक्ष स्पर्धेत भारताला किती फटका बसला हे साऱ्यांनी पाहिले. भारतीय खेळाडूंसोबत सर्फिंग करताना रवींद्र जडेजा पडला आणि त्याची गुडघ्याची दुखापत बळावली, अशी माहिती सुत्रांनी दिली. उपचार घेऊनही तो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वेळेत बरा झाला नाही. त्यानंतर आता बांगलादेश दौऱ्यावरील वन डे मालिकेतही त्याने माघार घेतल्याचे BCCI ने जाहीर केले आणि आताच हाती आलेल्या माहितीनुसार तो कसोटी मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपाठोपाठ बांगलादेश दौऱ्याला मुकणारा जडेजा मात्र पत्नी रिबावा जडेजा हिच्या प्रचारासाठी रॅली मागून रॅली काढताना दिसतोय.
ऑगस्ट महिन्यात जडेजा भारताकडून अखेरचा खेळला होता. बांगलादेश दौऱ्यासाठी त्याची संघात निवड केली गेली होती, परंतु ३३ वर्षीय अष्टपैलू खेळाडू अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही. तो आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होणार आहे आणि पुढील वर्षीच तो पुनरागमन करणार आहे. आशिया चषक स्पर्धेत हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यानंतर जडेजा मैदानापासून दूर आहे. त्याच महिन्यात त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यामुळेच त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
जामनगर उत्तर या मतदारसंघात भाजपने भारतीय क्रिकेट खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांच्या रुपात हायप्रोफाइल युवा चेहरा दिला आहे. पत्नीला जिंकवण्यासाठी रवींद्र जडेजा मैदानात उतरला असून, तो सभा, रोड शोमधून प्रचार करीत आहे.