कराची : ‘पदार्पण केल्यापासून भारताविरुद्ध एकही कसोटी सामना खेळायला न मिळणे अत्यंत दुर्दैवी म्हणावे लागेल,’ अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाह याने सोमवारी व्यक्त केली. ‘कसोटीत विराटसारख्या खेळाडूविरुद्ध मी गोलंदाजीतील कौशल्य पणाला लावू इच्छितो,’ असे शाह म्हणाला.
पाककडून २०११ मध्ये पदार्पण करणारा ३३ वर्षांचा शाह याने ३७ कसोटी सामन्यात २०७ गडी बाद केले. त्याला भारताविरुद्ध कधीही कसोटी खेळण्याचे भाग्य लाभलेले नाही. तो म्हणाला, ‘हे दुर्दैवी आहे. भारताविरुद्ध कसोटी खेळण्याची संधी मिळत नाही, असा विचार येताच मी निराश होतो. भारताविरुद्ध एकदिवसीय सामने देखील फार कमी झाले. भारतीय संघात काही अव्वल दर्जाचे खेळाडू आहे. कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजापुढे लेग स्पिन गोलनदाजी करीत गडी बाद करणे मजेशीर असते. मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहे.’ (वृत्तसंस्था)‘मनपासून इच्छा!’२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यापासून उभय संघ परस्परांविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळले नाहीत. शाह पुढे म्हणाला, ‘कधीकधी वाईट वाते. मात्र हे खेळाडूंच्या नियंत्रणाबाहेर आहे. आम्ही काहीच करू शकत नाही. मात्र मी लवकरच भारताविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळणे पसंत करणार आहे. तशी माझी मनोमन इच्छाही आहे.’