Join us  

भारताचं नशीबच खराब! आधी पावसाने फसवलं, आता शेजाऱ्यांनी; पाकिस्तानचा झाला मोठ्ठा फायदा

पाकिस्तानने श्रीलंकेला एक डाव व २२२ धावांनी हरवलं, टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये अव्वलस्थानी भक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 6:29 PM

Open in App

INDIA vs PAKISTAN in WTC POINTS TABLE: पाकिस्तान क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने मालिकेत 2-0 असा क्लीन स्वीप केला. दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या (SL vs PAK 2nd Test) संघाची अवस्था अत्यंत वाईट होती. त्यांना 200 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज नुमान अलीसमोर श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात पूर्णपणे असहाय्य दिसला. नुमानने दुसऱ्या डावात एकहाती 7 विकेट घेतल्या, तर तीन विकेट नसीम शाहने टिपल्या. त्यामुळे लंकेचा संघ १८८ धावांत तंबूत परतला. पाकिस्तानने या विजयासह विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यातील आपली स्थितीही अधिक मजबूत केली.

भारताला आधी पावसाने फसवलं, आता शेजाऱ्यांनी 'गेम' केला...

भारताला विंडिज विरूद्ध २-० ने जिंकण्याची संधी होती व क्लीन स्वीपची खात्रीही होती. पहिला सामना भारताने झटपट जिंकला होता. पण दुसऱ्या कसोटीत पावसाच्या हजेरीमुळे पाचव्या दिवशी सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे भारताला विंडिजवर १-० असा विजय मिळवता आला. पाकिस्तानला मात्र श्रीलंकेविरूद्ध दोनही कसोटी जिंकता आल्याने मोठा फायदा झाला.  श्रीलंकेने दुसरा सामना अनिर्णित राखला असता, तर पाकिस्तानला मोठ्या फरकाने अव्वल स्थान मिळाले नसते. पाकिस्तानच्या संघाने दोन कसोटी जिंकून २४ गुणांसह आपलं अव्वल स्थान अधिक मजबूत केलं. तर भारताला १ विजय आणि १ अनिर्णित सामन्यामुळे १६ गुणांवरच समाधान मानले आहे. अशा परिस्थितीत भारत सध्या दुसऱ्या स्थानी आहे.

असा रंगला सामना-

कोलंबो येथे पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांचा पहिला डाव 166 धावांत गारद झाला. श्रीलंकेसाठी पहिल्या डावात धनंजया डी सिल्वाने सर्वाधिक ५७ धावा केल्या. दुसरीकडे, गोलंदाजीत पाकिस्तानकडून अबरार अहमदने 4 बळी घेतले, तर नसीमच्या खात्यात तीन बळी होते.

पाकिस्तानने प्रत्युत्तरात अब्दुला शफीक (२०१) आणि आगा सलमानच्या (१३२) दमदार खेळीच्या जोरावर ५ बाद ५७८ धावांवर डाव घोषित केला. पाकिस्तानी संघाला पहिल्या डावात ४१० धावांची आघाडी मिळाली होती. पण लंकेचा दुसरा डाव 188 धावांवर आटोपला आणि पाकिस्तानने सामना एक डाव आणि 222 धावांनी जिंकला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजपाकिस्तानश्रीलंकाभारतीय क्रिकेट संघ
Open in App